अंगावर अनेक स्वेटर घालून नोंदविला विश्वविक्रम
एका युवतीने एकाचवेळी सर्वाधिक स्वेटर परिधान करण्याचा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. तिने एकाचवेळी 45 स्वेटर परिधान केले आहेत. या युवतीचे नाव सोफिया हेयडन आहे. तिने या स्वेटर्सना एक-एक करून परिधान केले आहे. प्रथम तिने एक स्वेटर पूर्ण कंबरेपर्यंत परिधान केला, त्यानंतर इतर स्वेटर अंगावर चढविले होते. घातलेले स्वेटर फाटलेले असू नयेत असा नियम तिला पाळावा लागला आहे. या सर्व स्वेटर्सना विक्रमाची नोंद झाल्यावर दान करण्यात आले आहे.
या विश्वविक्रमी कामगिरीचा व्हिडिओ गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने सोशल मीडियावर शेअर केला आहे. एकाचवेळी सर्वाधिक 45 स्वेटर्स परिधना करण्यात आले असल्याचे याच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले. सोफियाला एक महिला स्वेटर घालत असल्याचे यात दिसून येते, यादरम्यान सोफिया कधी डान्स करताना तर कधी हात जोडताना दिसून येते.
सोफियाने स्वत:च्या स्थानिक लायब्रेरीत विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सर्व स्वेटर्स दान केले आहेत. यापूर्वीचा विक्रम 40 स्वेटर परिधान करण्याचा होता. 2022 मध्ये फ्रान्सचे नागरिक थॉमस हॉक्वेट-उमाम्बो यांच्या नावावर हा विक्रम होता. तर त्यापूर्वी अमेरिकेचे थियोडोर किन्सेला यांनी एकाचवेळी 30 स्वेटर परिधान करण्याचा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला होता.