खेळण्यातील कार चालवून विश्वविक्रम
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद
जगभरातील विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नेहमीच अनोख्या कामगिरींची नोंद होत असते. अधिकाधिक नारळ फोडणे, सर्वाधिक दात असणे, अधिकाधिक बर्गर खाण्याचा विक्रम यात सामील आहे. परंतु आता एक वेगळाच विक्रम नोंदविला गेला आहे. यामध्ये एका व्यक्तीने खेळण्यातील कारचा वापर करून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्वत:चे नाव कोरले आहे.
आतापर्यंत तुम्ही बाइक, सायकल, कारवर स्वार होणारे अनेक चालक पाहिले असतील, पण जर्मनीत इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी मार्सेल पॉलने एका छोट्या इलेक्ट्रिक खेळण्यातील कारवर स्वार होत विश्वविक्रम नोंदविला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने यासंबंधी व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक व्यक्ती सुरुवातीला इलेक्ट्रिक कार सेट करून घेतो, त्यानंतर ही छोटीशी कार स्टार्ट करतो अणि जवळजवळ झोपून ही कार पूर्ण मैदानात चालवित असल्याचे दिसून येते.
खेळण्यातील ही इलेक्ट्रिक कार चालवून व्यक्तीने ‘फास्टेस्ट राइड-ऑन टॉय कार’ हा किताब पटकावला आहे. रायडिंगसाठी खेळण्यातील इलेक्ट्रिक कराचा वापर केल्याने त्याची गिनिज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. तसेच यादरम्यान मार्सेल पॉलची सर्वात वेगवान राइड 148 किलोमीटर प्रतितासा राहिली आहे.
मार्सेल पॉल हा मूळचा जर्मनीचा असून फुलदा युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेसमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. हा प्रयोग करण्यापूर्वी त्यांनी दहा महिने संशोधन आणि सराव केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकौंटवरून शेअर करण्यात आला आहे.