शापित बेट, खरेदी करणारेच संपले
जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचा इतिहास अत्यंत भीतीदायक आहे. यातील अनेक ठिकाणं अत्यंत सुंदर आहेत, परंतु तेथे जाण्याची कुणाचीच हिंमत होत नाही. असेच एक बेट रहस्यमय असून याचे नाव ‘गायोला’ आहे. ज्याला शापित बेटही म्हटले जाते. या बेटाची खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा त्याचा परिवार पूर्णपणे उद्ध्वस्त होतो असे सांगण्यात येते. इटलीच्या नेपल्सच्या उपसागरात हे सुंदर आणि रहस्यमय बेट आहे. या बेटाला खरेदी करणाऱ्या इसमाचे जगच उद्ध्वस्त झाले आहे. हे बेट इतके सुंदर आहे की कुणीही ते पाहून आकर्षित होऊ शकतो. या सुंदर बेटाला पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात, परंतु भीतीपोटी लोक येथून अंधार पडण्याआधी परत जातात.
गायोला बेट शापित असण्याचे कारण अत्यंत भीतीदायक आहे. गायोला बेट खरेदी करणाऱ्या इसमाचा मृत्यू होतो किंवा त्याचा व्यवसाय पूर्णपणे बुडतो. सातत्याने अशाप्रकारच्या घटना घडत असल्याने या बेटाला लोक शापित म्हणू लागले. या बेटावर रात्री जाण्याची कुणाचीच हिंमत होत नाही. 17 व्या शतकात या बेटावर अनेक रोमन कारखाने होते. नंतर या बेटाचा वापर नेपल्सच्या उपसागराच्या सुरक्षेसाठी होऊ लागला. 19 व्या शतकाच्या प्रारंभी या बेटावर एक पुजारी राहत होता, जो मच्छिमारांना मदत करायचा. पुजाऱ्याला जादूगार देखील म्हटले जायचे.
1871 मध्ये माशांचा व्यापार करणाऱ्या एका कंपनीचे मालक लुइगी नेग्री यांनी हे बेट खरेदी केले आणि येथे एक बंगला निर्माण केला. यानंतर लुइगी नेग्री यांची कंपनी बुडाली. 20 व्या शतकात या बेटाचा मालकी हक्क वेगवेगळ्या लोकांकडे राहिला. गायोलाच्या मालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. तेव्हापासून या बेटाला शापित म्हटले जाऊ लागले. 1920 च्या दशकात बेटाचे मालक हॅन्स ब्राउन यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह गालिचात गुंडाळलेला आढळून आला होता. काही काळानंतर त्यांच्या पत्नीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अशाच प्रकारे बेटाच्या अनेक मालकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे.