इस्तंबूल येथे आजपासून कुस्तीची जागतिक पात्रता फेरी
ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याची अमन सेहरावत, दीपक पुनिया यांना शेवटची संधी
वृत्तसंस्था/ इस्तंबूल
आज गुरुवारपासून येथे सुरू होणाऱ्या जागतिक पात्रता फेरीतून पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेतील स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रतिभावान अमन सेहरावत आणि अनुभवी दीपक पुनिया हे कुस्तीपटू मॅटवर उतरतली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने ही शेवटची स्पर्धा आहे.
23 वर्षांखालील विश्वविजेता अमन एक तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून किंवा बिश्केक येथील आशियाई पात्रता स्पर्धेतून पात्र ठरेल अशी आशा होती, पण दोन्ही संधी वाया गेल्या. बिश्केकमधील स्थान निश्चित करण्यासाठीच्या लढतीत अमनला (57 किलो) गुलोमजोन अब्दुल्लाएव्हसारख्या मजबूत प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागला, तर विश्व स्पर्धेतील रौप्यपदकविजेता दीपक (86 किलो) आणि सुजित कलकल (65 किलो) हे दोघेही वादळामुळे दुबईत अडकल्यामुळे वेळेवर बिश्केकला पोहोचू शकले नाहीत.
आता इस्तांबूल येथे सर्व भारतीय कुस्तीपटूंसाठी करो किंवा मरो अशी परिस्थिती आहे. जिथे प्रत्येक श्रेणीतील दोन अंतिम स्पर्धकांना ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळेल. त्याशिवाय दोन कांस्यपदक विजेत्यांमधील लढाईत विजेते ठरणाऱ्या कुस्तीपटूंना तिसरे स्थान दिले जाईल. या चार दिवशीय स्पर्धेची सुऊवात ग्रीको रोमन शैलीने होईल आणि त्यानंतर स्पर्धेच्या शेवटच्या दोन दिवशी महिला गटातील आणि फ्रीस्टाइल प्रकारातील लढती होतील.
कोणत्याही भारतीय पुऊष कुस्तीपटूला आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करता आलेले नाही. जयदीप (74 किलो) दीपक (97 किलो) आणि सुमित मलिक (125 किलो) यांनाही पुऊषांच्या फ्रीस्टाईलमधून स्थान मिळविण्याची ही शेवटची संधी आहे. आतापर्यंत भारताला चार स्थान मिळालेली आहेत आणि ती सर्व महिला कुस्तीपटूंनी मिळविलेली आहेत. याशिवाय मानसी अहलावत (62 किलो) आणि निशा दहिया (68 किलो) यांच्याकडूनही पूर्ण जोमाने प्रयत्न अपेक्षित आहेत.