जागतिक लोकसंख्या दिन : लोकसंख्येला लगाम हवा !
11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने....
11 जुलै 1987 रोजी युगोस्लाव्हिया येथे जगातील 500 कोटीव्या मुलाचा जन्म झाला आणि जागतिक स्तरावर वाढत्या लोकसंख्येची गंभीरपणे दखल घ्यायला सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (युनोच्या) लोकसंख्या निधी कार्यक्रम संस्थेने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जाहीर केला. आपापल्या राष्ट्रातील लोकसंख्या नियंत्रित ठेवावी व जगाचे त्यापासून रक्षण करावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. 20वे शतक लोकसंख्येच्या दृष्टीने एक आगळे शतक मानावे लागेल कारण या शतकात जागतिक लोकसंख्या चौपटीने वाढली. 20व्या शतकात सुरवातीला जगाची लोकसंख्या सुमारे दीड अब्ज होती. तिच जगाची लोकसंख्या 31 ऑक्टोबर 2011 रोजी 7 अब्ज म्हणजे 700 कोटी झाली.
जगाची लोकसंख्या दर मिनिटाला 176, दर तासाला 10,560 आणि दर दिवसाला 2,53,440 अशी वाढत आहे. अर्थात सन 1800 मध्ये जगाची लोकसंख्या 1 अब्ज होती. त्याचे 2 अब्ज व्हायला 130 वर्षे लागली, तीन अब्ज व्हायला आणखी 30 वर्षे लागली मात्र पाच, सहा आणि सात अब्ज व्हायला प्रत्येकी 12 वर्षे लागली आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येत, चीनचा वाटा : 18.47 टक्के, भारताचा वाटा:17.70 टक्के,अमेरिकेचा वाटा:4.25 टक्के, इंडोनेशियाचा वाटा:3.51टक्के आहे, तर इतर देशांचा वाटा तुलनेत अत्यल्प आहे. भारतापेक्षा चीनचा वाटा 0.77 टक्केने जास्त असला तरी चीनचे क्षेत्रफळ भारताच्या 3 पट अधिक आहे. विकसित राष्ट्रांमध्ये लोकसंख्या नियंत्रित, मर्यादित स्वरूपात आहे, विकसनशील देशांना मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही देशातून लोकसंख्या नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत, तर काही देश लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देत आहेत.
युरोप, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेच्या खंडातील राष्ट्रांनी आपली लोकसंख्या नियंत्रीत केली आहे, त्यामुळे त्या राष्ट्रातील जीवनमान उंचावलेले आहे. तेथील नागरिकांना दारिद्र्याची अन् रोगराईची फारशी झळ पोहचलेली नाही. याउलट आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या खंडातील राष्ट्रांची लोकसंख्या अनियंत्रितपणे वाढत आहे. त्यामुळे या खंडातील देशात असलेल्या साधन सामुग्रीवर विपरीत परिणाम होत आहे. तेथील लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत गरजा पूर्ण करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेथील जनता दारिद्र्या, उपासमार, अज्ञान आणि अनारोग्याच्या खाईत सापडली आहे. थॉमस रॉबर्ट मालथस यांनी इसवी सन 1798 मध्ये लोकसंख्येच्या संदर्भातील एक निबंध प्रकाशित केला, त्याचे शीर्षक होते, An Essay on the principle of population as it affects the future improvement of society, मालथसच्या या निबंधावर अनेक अभ्यासकानी जोरदार टीका केली. त्यानंतर इसवी सन 1803 मध्ये मालथसने निबंधाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. त्यानंतर अनेक देशांना भेटी दिल्या आणि 1826 मध्ये त्या निबंधाची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली. निबंधात मालथस म्हणतो, ‘लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने म्हणजे 1:2:4:8;16:32:64 वाढेल तर अन्न-धान्य-वाढ ही अंकगणिती श्रेणीत म्हणजे 1:2:3:4:5:6 या प्रकाराने वाढेल’. त्याने लोकसंख्या नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक व नैसर्गिक असे दोन प्रकार मानले आहेत. प्रतिबंधात्मक उपाय माणसांच्या हातात आहेत, परंतु नैसर्गिक उपाययोजनेमुळे मृत्यू दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.
मालथसच्या मते लोकसंख्या नियंत्रणाचे नैसर्गिक उपाय हे अतिशय भयंकर असतात. मानवनिर्मित उपायांनाच प्राधान्य पाहिजे. मानवाने ते उपाय केले नाहीत तर लोकसंख्या नियंत्रणाचे कार्य आपोआप निसर्गाकडून केले जाईल, जसे की गेल्या 2020 पासून चालू असलेली कोरोना संसर्गाची महामारी, भुकंप, रोगराई, दुष्काळ व महापुरामुळे लोकसंख्या नियंत्रण होईल. मालथसच्या सर्वच मुद्यांवर अनेक अभ्यासकांनी पुराव्यासह टीका केली. दुष्काळ, महापूर, त्सुनामी, संकटे, युद्धे आणि 2020 पासून जगभर व्यापून राहिलेले कोविड-19 अर्थात कोरोनाचे संकट पाहता मालथसचे भाष्य डोळ्यासमोर उभे राहते. मालथसने सांगितलेले लोकसंख्या नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय आपण विसरता कामा नयेत. किंबहुना, ते प्रतिबंधात्मक उपाय नव्या रुपात का असेना परंतु अमलात आणणे हीच आजच्या काळाची गरज आहे.
-डॉ. चंद्रकांत शं. कुलकर्णी