चांदीची झळाळी
सोने आणि चांदी हे भारतीयांचे आकर्षण जगजाहीर आहे. हौस आणि गुंतवणूक म्हणून या दोहोंमध्ये गुंतवणूक करण्याकडे भारतीयांचा नेहमीच कल राहिला आहे. किंबहुना मागच्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात अभूतपूर्व वाढ झाल्याचे दिसून येते. मुख्य म्हणजे एका दिवसात चांदीचा भाव दोन हजार रुपयांनी वाढून प्रतिकिलो 2 लाख 7 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चांदीला मिळालेली ही झळाळी ऐतिहासिकच ठरावी. खरे तर मागील वर्षीपर्यंत चांदीचा दर 75 हजार रुपयांपर्यंत सीमित होता. हा भाव दुपटीपेक्षा अधिक व्हावा, हे चांदीचे स्थान सोन्यापेक्षा वर चालल्याचे निदर्शक होय. खरे तर चांदीचे भाव वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. चांदीची वाढती मागणी, हे यातील एक कारण होय. सोन्यापाठोपाठ चांदीचे दागिने पसंत केले जातात, ही वस्तुस्थितीच आहे. पण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, इलेक्ट्रिक वाहने, हायब्रिड वाहने, सोलर पॅनल्स, मोबाईल, बॅटरी, औषध उद्योग, एआयचे हार्डवेअर, 5जी इन्फ्रास्ट्रक्चर यासह विविध आवश्यक वस्तूंच्या निर्मितीमध्ये चांदीचा वापर केला जातो. त्यामुळे चांदीला असलेली जवळपास 50 टक्के मागणी ही उद्योग क्षेत्रातून आहे. तथापि, चांदीला दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. यातून आजमितीला चांदी किती बहुपयोगी आणि बहुमूल्य आहे, हे लक्षात येते. परंतु, महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांदीचे मूल्य आणि मागणी मोठी असली, तरी चांदीचा पुवठा मात्र तितकासा होताना दिसत नाही. स्वाभाविकच या धातूचा तुटवडाच जाणवतो. गेल्या पाच वर्षांत मागणी व पुरवठा यातील व्यस्त प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ही कमतरताच चांदीचे महत्त्व वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे पहायला मिळते. जगातील मेक्सिको, चीन, चिली, पोलंड, पेरू, बोलिव्हिया, ऑस्ट्रेलिया, सर्बिया हे चांदीचे प्रमुख उत्पादक देश आहेत. या देशांमध्ये चांदीचे उत्पादन चांगले होते. स्वाभाविकच या देशांवर बऱ्याच अंशी अवलंबून राहावे लागते. तथापि, आयातीमधील अडचणींमुळे मर्यादा येतात. खरे तर गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून सध्या चांदीकडे पाहिले जाते. एकेकाळी सुवर्णखरेदी आणि गुंतवणुकीला लोक प्राधान्य देत असत. मात्र, दरवाढीमुळे सोन्याचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे लोक चांदीकडे वळले आहेत. भारतातील प्रत्येक राज्यातून चांदीला चांगली मागणी आहे. शेअर बाजारातूनही अलीकडे गुंतवणूकदारांना म्हणावा तसा परतावा मिळालेला नाही. त्यामुळे चांदीची झळाळी त्यांना आकर्षित करत आहे. परंतु, देशात, परदेशात सर्वदूर चांदीचा तुटवडा जाणवत आहे. त्यातूनच चांदीच्या किंमतीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, असे म्हणता येईल. पुढचे दिवस हे लग्नसराईचे आहेत. एप्रिल, मेपर्यंत लग्नसराईचा हंगाम असेल. त्यामुळे चांदीचे दर चढेच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनचे चांदीविषयक बदललेले धोरण हेही जागतिक स्तरावर चांदीची मागणी वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. जगातील सर्वांत मोठा चांदीचा ग्राहक म्हणून चीन पुढे येत आहे. चीन चांदीचा वापर सोलर पॅनेल उत्पादनामध्ये करतो. जागतिक सौर पॅनेलपैकी 80 टक्क उत्पादन या देशाकडून केले जाते. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व इतर गोष्टींकरिताही तेथे चांदीचा वापर करतात. त्यामुळे सर्वांत मोठा साठा असलेल्या पेरू देशापासून इतर रुपेरी देशांकडून चांदी जमवण्याकडे या देशाचा कल राहिला आहे. चीनकडे मोठ्या प्रमाणात चांदीचे साठे असल्याचीही वदंता आहे. या माध्यमातून चीन आपली आर्थिक ताकद वाढवत असल्याचा निष्कर्ष काढता येईल. अर्थात याला किनार आहे ती चीन व अमेरिकेतील व्यापार युद्धाची. या दोन देशातील व्यापार युद्धाचा तणाव काहीसा कमी झाला असला, तरी हा संघर्ष अद्याप संपलेला नाही आणि संपणारही नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. उलट या देशांमध्ये नवे चांदी युद्ध सुरू होऊ शकते. दक्षिण अमेरिकेतील अँडीज आणि मध्य अमेरिकेतील मेक्सिको देशामधील चांदीचे प्रचंड साठे घटत चालले आहेत. हे बघता महासत्तेच्या सत्तास्पर्धेतही चांदीला भविष्यात किती आणि कसे महत्त्व असेल, हे कळू शकेल. तुलनेत भारताकडे असलेला साठा कमीच. परंतु, चांदीचे दिवस लक्षात घेऊन या आघाडीवर भारताला रणनीती आखावी लागेल. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने महागाई, बेरोजगारी लक्षात घेऊन व्याजदरात कपात केली आहे. जागतिक तणाव, व्याजदर कपातीची शक्यता, शेअर बाजारातील अस्थिरता हे घटक लक्षात घेतले, तर सध्याचा सर्वांत चांगला आणि सुरक्षित पर्याय म्हणून चांदीकडेच पहावे लागेल. हे पाहता चांदीची भाववाढ अपेक्षितच म्हणता येईल. भारताची स्थूल अर्थव्यवस्था तशी बळकट आहे. परंतु, भारत व अमेरिकेतील व्यापार करार खोळंबल्याने रुपयावरील दबाव वाढत आहे. परिणामी रुपयाचे अवमूल्यन होत आहे. गुरुवारी रुपयाचा दर 39 पैशांनी घसरून 90.33 रुपये प्रति डॉलर इतक्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. रुपयाचा दर घसरल्याने आयात महाग होत आहे. स्वाभाविकच या दोन धातूंच्या दरात जास्त वाढ होत आहे. याचा परिणाम चालू खात्यावरील तुटीवर होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारकडून या आघाडीवर काही उपाययोजना केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हे बघता यासंदर्भात काय पावले उचलली जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सोने आणि चांदी यांच्याकडे पूर्वी केवळ दागिने म्हणून पाहिले जायचे. मात्र, आता तशी परिस्थिती नाही. गुंतवणुकीचे सशक्त माध्यम म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे सोन्या चांदीमधील केवळ दरावर लक्ष ठेऊन भागणार नाही. सोन्या चांदीचे साठे, आयात, उपलब्धता, परतावा अशा सगळ्या पैलूंवर लक्ष ठेवावे लागेल. पुढचे युद्ध हे आर्थिक स्वरुपाचे असेल. जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये समावेश झालेल्या भारताला त्यामध्ये मागे राहून चालणार नाही. सोने व चांदी ही आर्थिक श्रीमंतीची प्रतीके होती आणि यापुढेही राहतील. त्यामुळे अमेरिका, चीन यांना टक्कर देण्यासह आपले मूल्य वाढवण्यासाठी चांदीशिवाय पर्याय नसेल.