For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक पॅरा अॅथलेटिक्स आजपासून, भारत सर्वोत्तम प्रदर्शनास सज्ज

06:55 AM Sep 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
जागतिक पॅरा अॅथलेटिक्स आजपासून  भारत सर्वोत्तम प्रदर्शनास सज्ज
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जगातील काही सर्वोत्तम पॅरा अॅथलीट्स, ज्यात ब्लेड रनर्स, प्रोस्थेटिक जंपर्स आणि व्हीलचेअरवर बसून खेळणारे स्पर्धक यांचा समावेश आहे, ते आज शनिवारपासून येथे सुरू होणाऱ्या सर्वांत मोठ्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत त्यांचे प्रेरणादायी धैर्य आणि लवचिकता दाखवतील. पॅरा अॅथलेटिक्ससह पॅरा स्पोर्ट्समध्ये शक्ती वाढत असलेल्या भारताने या स्पर्धेच्या 12 व्या आवृत्तीसाठी उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपर्यंत प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर चालेल. नऊ दिवसांच्या या स्पर्धेत 104 देशांतील खेळाडू आणि अधिकारी मिळून 2200 जण सहभागी झाले आहेत. नवी दिल्लीत होत असलेली ही स्पर्धा इतिहासातील सर्वांत मोठी आहे. भारत हा कतार (2015), यूएई (2019) आणि जपान (2024) यांच्यानंतर या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करणारा चौथा देश म्हणून सामील झाला आहे. 1500 हून अधिक पॅरा अॅथलीट्स 186 पदकांसाठीच्या स्पर्धांमध्ये भाग घेतील. 2024 च्या कोबे, जपान येथे झालेल्या आवृत्तीपेक्षा यंदा 15 अधिक पदके ठेवण्यात आली आहेत.

Advertisement

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये एकूण 308 पदके जिंकणारे 100 हून अधिक पदकविजेते या भव्य पॅरा अॅथलेटिक्स मंचावर आपली क्षमता पणाला लावण्यास सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत पुऊषांसाठी 101, महिलांसाठी 84 आणि मिश्र एक स्पर्धा असेल. या स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणजे स्पर्धास्थळी ठेवलेला मोंडो ट्रॅक तसेच सराव क्षेत्र आहे. द्विस्तरीय व्हल्कनाइज्ड रबरपासून बनवलेला हा ट्रॅक खेळाडूंच्या कामगिरीस पोषक असून दुखापतीचा धोका कमी करतो. याशिवाय वॉर्म-अप एरियामध्ये एलईडी फ्लडलाइट्स बसवण्यात आले आहेत, जेणेकरून खेळाडू सूर्यास्तानंतर किंवा पहाटे लवकर सराव करू शकतील. स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या वापरासाठी वॉर्म-अप एरियाजवळ एक उच्च दर्जाचे फिटनेस सेंटर देखील बांधण्यात आले आहे.

जेएलएन स्टेडियममध्ये पॅरा अॅथलेटिक्स जगतातील अनेक सर्वोत्तम पॅरा अॅथलीट स्पर्धा करतील आणि त्यामध्ये जर्मनीचा ‘ब्लेड जम्पर’ मार्कस रेहम, स्वित्झर्लंडची व्हीलचेअरवरील रेसर कॅथरीन डेबरनर आणि ब्राझीलचा सर्वांत वेगवान पॅरा स्प्रिंटर पेट्रुसियो फरेरा यांचा समावेश असेल. भारताची शान असलेल्या खेळाडूंमध्ये सुमित अँटिल (अपघातामुळे डावा पाय कापला गेला) या दोन वेळच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या आणि पुऊषांच्या भालाफेक एफ64 मधील गतविजेत्याचा समावेश होतो. प्रवीण कुमार (जन्मजात दोषामुळे पाय लहान) हा पुऊषांच्या टी64 उंच उडीतील पॅरिस पॅरालिम्पिक विजेता आहे. तो मायभूमीतील जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाची भर आपल्या पदक संग्रहात घालण्यास उत्सुक असेल.

74 खेळाडूंचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा संघ मैदानात उतरविलेला भारत पदक तालिकेत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य बाळगून आहे. गेल्या दोन स्पर्धांत आणि पॅरिस पॅरालिंपिकमध्ये सातत्याने केलेल्या सुधारित कामगिरीच्या आधारे भारतीय पॅरालिंपिक समिती देशासाठी 20 हून अधिक पदकांची अपेक्षा करत आहे. भारताने 2019 च्या दुबई आवृत्तीत नऊ पदके (2 सुवर्ण, 2 रौप्य, 5 कांस्य), 2023 साली पॅरिसमध्ये 10 पदके (3 सुवर्ण, 4 रौप्य, 3 कांस्य) जिंकली होती आणि 2024 मध्ये जपानमधील कोबे येथे 17 (6 सुवर्ण, 5 रौप्य, 6 कांस्य) पदके जिंकून सहावे स्थान मिळविले होते. दीप्ती जीवनजी (महिला 400 मीटर टी20), सचिन खिलारी (पुऊषांची गोळाफेक स्पर्धा एफ46), सुमित, एकता भ्यान (महिला क्लब थ्रो एफ51) आणि सिमरन शर्मा (महिला 200 मीटर टी12) हे सारे खेळाडू 2024 मध्ये जिंकलेली सुवर्णपदके राखण्याची आशा बाळगतील.

Advertisement
Tags :

.