जागतिक मराठी संमेलनाची पणजीत सभा
पणजी : जागतिक मराठी अकादमी मुंबईतर्फे 21 वे जागतिक मराठी संमेलन 2026 पणजीच्या कला अकादमी सभागृहात जानेवारी च्या 9, 10 व 11 असे तीन दिवस भरवले जाणार आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेसाठी हे संमेलन भरवले जाणार आहे. या संमेलनाच्या आयोजन समितीची सभा शनिवार 8 रोजी इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझाच्या सभागृहात समितीचे कार्याध्यक्ष दशरथ परब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जागतिक मराठी अकादमीचे संयोजक राजीव मंत्री, कार्यवाह गौरव फुटाणे, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तसेच संमेलनाचे सरचिटणीस अनिल सामंत, कार्यवाह परेश प्रभू, खजिनदार डॉ. गौतम देसाई, बिल्वदल परिवाराचे सागर जावडेकर, पौर्णिमा केरकर, कालिका बापट, नीलेश नाईक, अशोक परब, राजमोहन शेट्यो आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तीन दिवसांच्या या संमेलनातील कार्यक्रमाची रूपरेषा आखून विविधतेच्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध उपस्थितांची निवड करण्यात आली तसेच जागतिक स्तरावरून येणाऱ्या अतिमहनीय व्यक्तींसाठी राहण्यासाठीच्या विषयावर चर्चा केली गेली. गोमंतकीय साहित्यिकांना या संमेलनात स्थान देण्यासाठी कवी कट्टा असणार आहे. राजीव मंत्री, गौरव फुटाणे, प्रा. अनिल सामंत, सागर जावडेकर, परेश प्रभू, कालिका बापट आदींनी मौलिक सूचना केल्या. दशरथ परब यांनी स्वागत केले.