विश्वचषक : वेई यी - सिंदारोव्ह लढत टायब्रेकरमध्ये
वृत्तसंस्था/ पणजी
फिडे बुद्धिबळ विश्वचषकात रशियाचा ग्रँडमास्टर आंद्रे एसिपेंकोने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबबोएव्हवर सलग दुसरा विजय मिळविला. दुसरीकडे, विश्वचषकाचा विजेता टायब्रेकरमधून ठरणार असून चीनचा वेई यी आज बुधवारी होणाऱ्या टायब्रेकरमध्ये उझबेकिस्तानचा दुसरा खेळाडू जावोखिर सिंदारोव्हविऊद्ध लढेल.
या स्पर्धेत ‘फिडे’ ध्वजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एसिपेंकोने उपांत्य फेरीत वेई यीचा अडथळा पार न करता आल्यानंतर आपली प्रभावी कामगिरी चालू ठेवली असून त्याने दुसऱ्या टायब्रेकर सामन्यात प्रशंसनीय संयम दाखवत याकुबबोएव्हला दुसऱ्यांदा हरवले आणि कँडिडेटमध्ये आपले स्थान निश्चित केले. अंतिम फेरीत सिंदारोव्हविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना वेई यीने अतिसावध पवित्रा घेतला आणि सामना बरोबरीत सोडविण्यावर समाधान मानले.