For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वर्ल्डकप ठरतोय रोमांचक, एकाच दिवशी दोन मोठे उलटफेर

06:55 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
वर्ल्डकप ठरतोय रोमांचक   एकाच दिवशी दोन मोठे उलटफेर
Advertisement

अफगाणिस्तानचा न्यूझीलंड तर बांगलादेशचा  श्रीलंकेवर विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ गयाना

आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेल 2 जूनपासून अमेरिका व विंडीजमध्ये प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 15 सामने खेळून झाले असून यातील काही सामन्यात चांगलाच रोमांच प्रेक्षकांना पहायला मिळाला. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते, यातही टी 20 क्रिकेट म्हणजे बेभरवशाचे म्हणून ओळखले जाते. कारण या प्रकारात कधी सामना पलटेल हे सांगता येत नाही. मागील दोन दिवसात असे उलटफेर पहायला मिळाले. यातच शनिवारी देखील असाच प्रकार पहायला मिळाला. अफगाणिस्तानने बलाढ्या न्यूझीलंडला 84 धावांनी पराभूत केले तर बांगलादेशने श्रीलंकेवर 2 गड्यांनी विजय मिळवला. या विजयासह अफगाण संघ क गटात चार गुणासह अव्वलस्थानी आहे. बांगलादेशने विजयासह दोन गुण मिळाले आहेत. श्रीलंकन संघ मात्र सलग पराभवामुळे बॅकफूटवर गेला आहे.

Advertisement

गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा 84 धावांनी धुव्वा उडवला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानचा न्यूझीलंडवर पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकांत 6 बाद 159 धावा केल्या. रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी झाली. मॅट हेन्रीने झद्रनला बाद करत अफगाणला पहिला धक्का दिला. झद्रनने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. यानंतर हेन्रीने अजमतुल्ला ओमरझाईला आपला बळी बनवले. तो 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गुरबाजने मात्र शानदार खेळी साकारताना 56 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारासह 80 धावा केल्या. त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. किवीज संघाकडून बोल्ट व हेन्री यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

न्यूझीलंड 75 धावांत ऑलआऊट

160 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी तर कमालच केली. फजलहक फारुकी आणि कर्णधार राशिद खान यांनी जबदरस्त गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी चार-चार बळी घेत न्यूझीलंडला 75 धावांत गुंडाळले. किवीज संघाकडून ग्लेन फिलिप्स (18 धावा) व मॅट हेन्री (12 धावा) या दोघांना दुहेरी आकडा गाठता आला. इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने किवीज संघ पूर्ण षटकेही खेळू शकला नाही आणि त्यांचा डाव 15.2 षटकांत 75 धावांत आटोपला. न्यूझीलंडने हा सामना 84 धावांनी गमावला असून, हा त्यांचा टी-20 वर्ल्डकपमधील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी 2014 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघ श्रीलंकेविरुद्ध 59 धावांनी पराभूत झाला होता.

सक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान 20 षटकांत 6 बाद 159 (गुरबाज 80, इब्राहिम झद्रन 44, ओमरझाई 22, ट्रेंट बोल्ट व मॅट हेन्री प्रत्येकी दोन बळी).

न्यूझीलंड 15.2 षटकांत सर्वबाद 75 (ग्लेन फिलिप्स 18, मॅट हेन्री 12, फारुखी 17 धावांत 4 बळी, रशीद खान 17 धावांत 4 बळी).

बांगलादेशचा श्रीलंकेला दे धक्का

डलास : येथील ग्रँड पेयरी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला. हा लो स्कोअरिंग सामना होता, ज्यामध्ये दोन्ही संघ शेवटपर्यंत लढले. लंकेने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 124 धावा केल्या. 125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला ही घाम फुटला. मात्र लक्ष गाठत हा सामना त्यांनी 2 गडी राखून जिंकला. सलग दोन पराभवामुळे  लंकन संघ अडचणीत आला आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांच्यासाठी अगदी योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लंकन फलंदाजांना 20 षटकांत 9 बाद 124 धावा करता आल्या. सलामीवीर पथुन निसंकाने सर्वाधिक 47 धावा केल्या तर धनजंय डी सिल्वाने 21 तर असलंकाने 19 धावा केल्या. इतर खेळाडू मात्र सपशेल अपयशी ठरले. बांगलादेशकडून मुस्तफिझूर रहमान आणि रिशाद हुसेनने प्रत्येकी 3 बळी घेतले.

125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सौम्या सरकारच्या रूपानं पहिला धक्का बसला, जो खाते न उघडता धनंजय डी सिल्वाचा बळी ठरला. त्यानंतर तनजीद हसनच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. तो केवळ 3 धावा करू शकला. कर्णधार नझमुल हुसेन शांतो 7 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. चौथ्या विकेटसाठी तौहीद हृदोय आणि लिटन दास यांनी 63 धावांची भागीदारी केली. 12 व्या षटकात हसरंगाने हृदोयला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यावर ही भागीदारी संपुष्टात आली. तौहीदनं 20 चेंडूत 40 धावा केल्या. पाठोपाठ लिटन दासही 36 धावा काढून बाद झाला. ही जोडी बाद झाल्यानंतर बांगलादेशची पुन्हा एकदा फरफट झाली. बांगलादेश एकवेळ 8 बाद 113 अशा अडचणीत होता. यावेळी अडचणीत सापडलेल्या बांगलादेशला महमुदुल्लाहने विजय मिळवून दिला. त्याने 13 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. लंकेकडून नुवान तुषाराने सर्वाधिक 4 गडी बाद केले.

Advertisement
Tags :

.