विश्व ब्लिट्झ बुद्धिबळ : आर. वैशालीला कांस्यपदक
खुल्या विभागात कोंडी न फुटल्याने प्रथमच कार्लसन - नेपोम्नियाचीला संयुक्त विजेतेपद
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताच्या आर. वैशालीने जागतिक ब्लिट्झ स्पर्धेच्या महिला विभागात कांस्यपदक पटकावले असून जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या कोनेरू हम्पीनंतर आणखी एक मजबूत कामगिरी भारतीय बुद्धिबळपटूकडून नोंदवली गेली आहे.
वैशालीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झु जिनेरचा 2.5-1.5 असा पराभव केला, मात्र उपांत्य फेरीत चीनच्या जू वेनजुनसमोर तिला 0.5-2.5 असा पराभव पत्करावा लगाला. चीनचे पूर्ण वर्चस्व राहिलेल्या या स्पर्धेत जू वेनजुनने आपल्याच देशाच्या लेई टिंगजीचा 3.5-2.5 असा पराभव करत जगज्जेतेपदावर नाव कोरले. पाच वेळचे विश्वविजेता आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) उपाध्यक्ष विश्वनाथन आनंद यांनी वैशालीच्या प्रयत्नांबद्दल तिचे अभिनंदन केले आणि म्हटले की, वर्षाचा शेवट खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे. ‘तिने खरोखरच दमदार कामगिरी केली. आमच्या ‘वाका’च्या (वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमी) प्रशिक्षणार्थीच्या कामगिरीबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, असे आनंदने ‘एक्स’वर नमूद केले आहे.
‘वैशालीला आणि तिच्या खेळाला पाठिंबा देताना आम्हाला खूप आनंद होतो. 2024 ची समाप्ती किती चांगल्या पद्धतीने झाली आहे. 2021 मध्ये आम्हाला वाटले होते की, आम्हाला अधिक मजबूत बुद्धिबळपटू मिळतील. पण येथे तर आमच्याकडे जागतिक विजेती (हम्पी) आणि कांस्यपदक विजेती (वैशाली) आहे, असेही आनंदने म्हटले आहे.खुल्या विभागात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला मॅग्नस कार्लसन आणि रशियाचा इयान नेपोम्नियाची यांच्यातील तीन सडन डेथ लढतींतूनही विजेता न ठरल्याने ब्लिट्झ विजेतेपद दोघांनाही संयुक्तपणे देण्यात आले. कार्लसनने कोंडी कायम राहिल्याने विजेतेपद दोघांनाही संयुक्तपणे बहाल केले जाऊ शकते का, असे विचारले. दोन खेळाडूंना संयुक्तपणे विजेतेपद बहाल करण्याची ही पहिलीच वे‘ळ आहे.
आम्ही दोघेही थकलो होतो, काहींना ते आवडेल तर काहींना आवडणार नाही’, असे कार्लसनने नंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. ‘आम्ही बऱ्याच वेळेनंतर त्या टप्प्यावर पोहोचलो. आम्ही बरेच सामने खेळलो, आमचे तीन सामने बरोबरीत राहिले. मला वाटले की, मी खेळत राहू शकेन. पण विजेतेपद संयुक्तपणे देणे हा एक चांगला उपाय होता’, असे तो म्हणाला.
या आठवड्यातील कार्लसनचा हा दुसरा मोठा विजय म्हणावा लागेल. कारण ड्रेस कोडच्या उल्लंघनामुळे काही दिवसांपूर्वीच जलद बुद्धिबळ स्पर्धेतून त्याने माघार घेतल्यानंतर जागतिक संघटनेला त्याला परत आणणे भाग पाडले होते. कार्लसन जलद बुद्धिबळ स्पर्धेत जीन्स परिधान करून आला होता आणि त्याने फॉर्मल पोशाख परिधान करण्यास नकार दिला होता, ज्यामुळे ‘फिडे’ने त्याला अपात्र ठरवले होते. तथापि, जागतिक प्रशासकीय समितीने त्याला ब्लिट्झ प्रकारात जीन्स परिधान करून खेळण्याची परवानगी दिली.