वर्ल्ड नाबार्ड बँकेच्यावतीने कबनाळी रस्ता कामासाठी तीन कोटी रु.मंजूर
वार्ताहर/कणकुंबी
वर्ल्ड नाबार्ड बँकेच्या अधिकाऱ्यांची कबनाळी गावच्या रस्त्याचा शनिवारी पाहणी दौरा केला. सदर अधिकारी दिल्लीहून थेट सांबरा एअरपोर्टवर हजर होऊन तेथून कबनाळी या गावी पोहोचले. गावच्या रस्त्यासाठी पीएमजीएसवाय योजनेतून तीन कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. सदर निधी मंजुरीसाठी विनायक मुतगेकर गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होते. मुतगेकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून शनिवारी नाबार्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपण सदर निधी रोड कामासाठी देतो, असे वचन दिले. आपण त्या रोडचे इस्टिमेट करून प्रस्ताव पाठवा, असे पी. एम. जी. एस. वाय. अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर नूतन मॅडम यांना आदेश दिले. यावेळी नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, आपण नाबार्ड बँकेतून देशातील सात हजार किलोमीटर रस्त्यासाठी निधी पुरवणार आहे. त्यामध्ये कर्नाटक राज्यातून बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कबनाळी हे एक गाव आहे. या गावचा तीन किलोमीटर रस्ता आता सुंदररित्या होणार आहे. अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांतर्फे व विनायक मुतगेकर तसेच निलावडे ग्राम पंचायतमार्फत स्वागत करण्यात आले.