भुवनेश्वरमध्ये वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्व्हर स्पर्धा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत पुढील वर्षी 22 ऑगस्ट रोजी भुवनेश्वरमध्ये पहिल्यांदाच वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्व्हर स्पर्धेचे आयोजन करणार आहे. यंदा याच ठिकाणी झालेल्या कांस्य स्तरावरील स्पर्धेपेक्षा जास्त दर्जाची ही स्पर्धा आहे, अशी घोषणा राष्ट्रीय महासंघाने येथे केली.
अधिक दर्जाचा अर्थ सहभागींसाठी उच्च रँकिंग गुण असतील ज्यामुळे या स्पर्धेकडे अधिक क्षमतेचे खेळाडू आकर्षित होतील. भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमने यावर्षी 10 ऑगस्ट रोजी कांस्य स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘आम्ही यावर्षी कांस्यस्तरीय कॉन्टिनेंटल टूर स्पर्धा आयोजित केली होती, म्हणून पुढच्या वर्षी आम्ही रौप्यस्तरावरील स्पर्धेचे आयोजन करणार आहोत’, असे अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एएफआय) स्पर्धा संचालक रविंदर चौधरी यांनी 2026 च्या कार्यक्रमांची माहिती देताना सांगितले.
‘कॉन्टिनेंटल टूर’ ही ‘वर्ल्ड अॅथलेटिक्स’च्या छत्राखाली आयोजित केल्या जाणाऱ्या ट्रॅक अँड फील्ड स्पर्धांची वार्षिक मालिका आहे आणि ती प्रतिष्ठित डायमंड लीगनंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धांतील दुसऱ्या श्रेणीची स्पर्धा आहे. त्याचे तीन स्तर आहेत, सर्वांत वरचे स्थान सुवर्ण स्तराला असून त्यानंतर रौप्य आणि कांस्य स्तरांचा क्रमांक लागइतो.
दरम्यान, एएफआयने जानेवारी ते मार्च या कालावधीत भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महासंघाने या महिन्याच्या सुऊवातीला ही स्पर्धा जानेवारीमध्ये होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु चौधरी यांनी सांगितले की ती 24 आणि 25 मार्च रोजी आयोजित केली जाईल. ओडिशाच्या राजधानीतील कलिंगा स्टेडियम संकुलातील अत्याधुनिक इनडोअर सुविधेत या स्पर्धेचे आयोजन होईल.