‘युवा द चेंजमेकर्स’ विषयावर संस्कृती एज्युकेअरतर्फे कार्यशाळा
प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी, देशमुख रोडवरील संस्कृती एज्युकेअरतर्फे ‘युवा द चेंजमेकर्स’ या विषयावर एकदिवसीय विनामूल्य कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये मानसिकता, नातेसंबंध, लैंगिक शिक्षण आणि करिअर अशा चार विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
संस्कृतीचे संचालक तेजस कोळेकर म्हणाले, आज मुले आणि पालक यांच्यामध्ये दृढ असे बंध राहिले नाहीत. हे दोन्ही घटक आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांच्यात संवाद होत नाही. त्यामुळे मुलांची आपल्या मित्रांमध्ये अधिक गुंतवणूक वाढते. पालकांना आज अवास्तव अपेक्षा आहेत. मुलांमध्ये ते बदल घडवू शकतात. परंतु, मुलांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही आणि पालकांच्या वर्तनाचे निरीक्षण करून मुले कधी कधी त्याचा गैरफायदा घेऊन पालकांनाच निरुत्तर करतात, हे वास्तव आहे.
कार्यशाळेत पालक आणि मुले दोघांनाही त्यांच्या इच्छा, त्यांच्या भावना आणि अपेक्षा याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. मुलांना फारशी माहिती नाही, असे आपल्याला वाटते. परंतु, अनेक संवेदनशील विषयांवर त्यांना माहिती आहे. फक्त ती अर्धी असू शकते किंवा चुकीची असू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांचे शिक्षण करायला हवे आणि योग्य माहिती द्यायला हवी, असेही कोळेकर म्हणाले.
आजच्या जगात आपण चंगळवाद आणि भौतिक गोष्टींनाच महत्त्व देत आहोत. परंतु, मुलांच्या विकासासाठी भावनिक आणि आध्यात्मिक वाढसुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे वेळेवर मुलांना मार्गदर्शन करून त्यांचे जीवन सुकर करण्याची जबाबदारी पालकांची आहे, असेही ते म्हणाले.