For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बोगद्यात अडकलेले कामगार सुरक्षित

06:35 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
बोगद्यात अडकलेले कामगार सुरक्षित
Advertisement

एंडोस्कोपी कॅमेऱ्यातून दर्शन : बाहेर काढण्याचे नव्याने प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था / उत्तरकाशी

उत्तराखंडातील उत्तरकाशी येथे निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळल्यामुळे अडकलेले सर्व 41 कामगार सुरक्षित असून त्यांना बाहेर काढण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. एंडोस्कोपी कॅमेऱ्यातून हे सर्व कामगार सुरक्षित असल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यांचे व्हिडिओ चित्रणही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Advertisement

हे कामगार आत अडकून आता 240 तास होऊन गेलेले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विदेशातून बोगदा तज्ञांना आणण्यात आलेले असून आता त्यांना बोगद्याच्या वरुन ड्रिलींग करुन काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी नवीन यंत्रे आणण्यात आली असून त्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. बोगद्याच्या मागच्या बाजूस असणाऱ्या बारकोट येथून बोगद्यात जाण्याचा मार्ग काढण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

तीन मीटर व्यासाचा बोगदा

कामगारांना बाहेर काढण्यासाठी नवा बोगदा काढण्यात येत असून तो सध्याच्या बोगद्याच्या वरुन काढण्यात येणार आहे. या नव्या बोगद्याचा व्यास तीन मीटरचा ठेवण्यात आला आहे, जेणेकरुन कामगारांना बाहेर काढण्यात कोणतीही अडचण येऊ नये. सर्व कामगार सुरक्षित असून त्यांची प्रकृतीही चांगली आहे, असे कॅमेऱ्यातून स्पष्ट दिसत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

खिचडीचा आहार

या कामगारांना प्लास्टिकच्या बाटल्यांमधून गरम खिचडी पाठविण्यात येत आहे. या अन्नपुरवठ्यासाठी एक अरुंद मार्ग खोदण्यात आला आहे. त्यातून त्यांना अन्न आणि पाणी देऊन त्यांची सोय करण्यात आली आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी सोय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष आहार नियोजन

बोगद्यातील कोंदट हवेमुळे या कामगारांना आजार होऊ नयेत तसेच त्यांना पचनाचे विकार जडू नयेत यासाठी त्यांच्यासाठी वैद्यकीय आहार तज्ञांच्या साहाय्याने विशेष आहार नियोजन करण्यात आले आहे. त्यांना पचण्यास हलका पण शक्तीवर्धक आहार देण्यात येत आहे. गरम खिचडीप्रमाणेच त्यांना ताजी फळे, गव्हाची खीर आणि इतर खाद्यपदार्थ पुरविण्यात येत आहेत.

सहा इंचाचा मार्ग

या कामगारांना अन्नाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहा इंच व्यासाचा एक मार्ग खोदण्यात यश आले आहे. याच मार्गातून त्यांच्याशी संपर्क करण्यात येत आहे. त्यांचे नीतीधैर्य टिकून रहावे, यासाठी त्यांच्याशी त्यांचा नातेवाईकांचा संपर्क घडविण्याचीही योजना आहे. ही एकंदर स्थिती अडकलेल्या कामगारांसाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी धडपडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे.

आता फोन पाठविणार

आतील कामगारांना बाहेरच्या लोकांशी सतत संपर्क करता यावा, यासाठी पाईपलाईनमधून आत एक मोबाईल फोन पाठविला जाणार आहे. हा फोन बाहेरुन चार्ज करता यावा अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी अजून तीन ते चार दिवस लागू शकतात, असे तज्ञांचे मत आहे.

बोगद्याची स्थिती तपासणार

आत पाठविलेल्या कॅमेऱ्यातून बोगद्याच्या आतील भागाची आणि कामगार असलेल्या भागाची स्थिती तपासण्यात येत आहे. त्यानुसार कामगारांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य अशा सूचना देण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कठीण आव्हानांना तोंड देऊन या कामगारांची सुखरुप सुटका करण्यात येईल, असा निर्धार उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी व्यक्त केला आहे.

सुटका कार्य युद्धपातळीवर

ड अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी विदेशी तज्ञांना पाचारण

ड नव्या पाईपलाईनमधून कामगारांना अन्नपाण्याचा होतो पुरवठा

ड आत मोबाईल फोन सोडून कामगारांशी संपर्काची आहे योजना

ड सर्व 41 कामगार सुरक्षित असल्याचे दाखवितात कॅमेऱ्याची दृष्ये

Advertisement
Tags :

.