महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'ईएसआय’ला निधी असूनही काम रखडले

04:12 PM Dec 20, 2024 IST | Radhika Patil
Work stalled despite ESI funds
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआय) हॉस्पिटलच्या इमारतीच्या सुसज्ज व सर्व सोयीनियुक्त 100 बेडच्या आंतररूग्ण विभाग नुतनीकरणाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. मात्र, काम सुरू होऊन पाच वर्षे झाले तरी अद्याप 50 टक्केही काम झाले नसल्यामुळे लाभार्थी विमाधारकांना ईएसआयशी संलग्नित हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत आहे. नुतनीकरणाच्या कामानंतर सर्व उपचार एकाच छताखाली मिळणार असले तरी आणखी किती दिवस प्रतिक्षा करायची? असा सवाल विमाधारकांतून केला जात आहे.

Advertisement

नुतनीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध असुनही काम रखडण्यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. काम पुर्णत्वास उशिर लागत असल्याने याचे बजेटही वाढत आहे. बजेट वाढल्याने दोन वर्षापुर्वी ठेकेदाराने काम अर्ध्यात सोडून पलायन केले होते. यानंतर नव्याने ठेकेदाराकडे काम दिले होते. तरीही याचे काम कासवगतीने सुरू आहे. कामाला गती येणे अपेक्षित असताना याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. याचे काम लवकरात लवकर पुर्णत्वाकडे नेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.

नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञ विसकसित होणार आहेत. यामध्ये विमाधारकांना सर्व प्रकारचे उपचार एकाच छताखाली मिळणार आहेत. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी सुसज्ज तीन ऑपरेशन थिएटर विकसित केली जाणार आहेत. यामध्ये प्रसुती, पोटविकार, आतड्यांचे आजार, हाडांचे विकार, त्वचा विकार, मेंदू विकार, कान, नाक, घशाच्या शस्त्रक्रिया, स्त्रीरोग शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या सर्व शस्त्रक्रिया व उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहेत

ठेकेदार टिकेनात...

पाच वर्षापुर्वी नुतनीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रातून कोट्यावधींचा निधी आणला. यातून कामाची निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. यानंतर कोरोनामुळे कामाला ब्रेक मिळाला, त्यामुळे वस्तूंचे दर वाढले. ठेकेदाराला काम परवडत नसल्याने काम बंद पडले. यानंतर दुसऱ्या ठेकेदारानेही थोडे काम सुरू केल्यानंतर थोड्याच दिवसात पळ काढला. आत तिसरा ठेकेदाराकडुनही संथ गतीने काम सुरू आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज...

जे काम दिड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते ते काम पाच वर्षे झाले तरी पूर्ण झालेले नाही. ईएसआय प्रशासनाकडून 6 महिन्यात काम पूर्ण होणार असे सांगितले जात असले तरी मागील चार वर्षापासून अशीच आश्वासने दिली जात आहेत. यापुढे नुतनीकरणाचे काम रखडू नये, यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथ 6 महिन्याचे आणखी 6 वर्षे होतील अशी शंका उपस्थित केली जात आहे.

एमआरआयसाठी संलग्नित हॉस्पिटल वाढविण्याची गरज

एखाद्या आजाराच्या अचुक निदानासाठी एमआरआय तपासणी उपयुक्त ठरते. याच्या तपासणीसाठी रूग्णांची संख्या अधिक आहे. पण एमआरआयसाठी ईएसआयकडे दोनच हॉस्पिटल संलग्नित असल्यामुळे विमाधारकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तपासणीवर मर्यादा येत आहेत. यासाठी एमआरआय तपासणी संलग्नित हॉस्पिटल वाढविण्याची गरज आहे.

नुतनीकरणनंतरच्या सुविधा

तीन सुसज्ज ऑपरेशन थिएटर

10 बेडचा आयसीयू विभाग

100 बेडची व्यवस्था

स्त्री प्रसुती व स्त्रीरोग कक्ष

सिटी स्कॅन, रेडिओलॉजी, एक्स-रेची सुविधा

सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचार

सध्या उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या

एकूण लाभार्थी : 1 लाख 40 हजार

एकूण बेड : 30

उपचार घेणारे रूग्ण : 6 लाख 40 हजार

रोज तपासणीसाठी येणारे रूग्ण : 450 ते 500

रोज अॅडमिट रूग्ण : 150 ते 200

                                          काम लवकर पुर्णत्वासाठी प्रयत्न

गेल्या पाच वर्षात काम सुरू झाल्यापासून तीन ठेकेदार बदलले. कोरोनामुळे काहीकाळ काम थांबले. सद्यस्थितीत काम काम प्रगतीपथावर आहे. पुढील 6 महिन्यात नुतनीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रूग्णांना दर्जेदार उपचार देण्यासाठी कटीबद्ध आहोत. नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर उपचारामध्ये आणखी सुलभता येणार आहे. काम पुर्णत्वासाठी प्रयत्न सुरू आहेत.

                                                                   डॉ. रविंद्र पवार, वैद्यकीय अधिक्षक, ईएसआय हॉस्पिटल

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article