विद्यापीठात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध कार्यक्रम
कोल्हापूर
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त 22 ते 28 डिसेंबर कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या गणित अधिविभागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 22 डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड उत्पन्न होऊन ती वृध्दिंगत व्हावी, यासाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “जीवनातील गणित“ या विषयावर लेखक व गणिताचे अभ्यासक डॉ. दिपक मधुकर शेटे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन व मॉडेल कॉम्पिटिशन स्पर्धांचे आयोजन केले आहे.
शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांतील व गणित अधिविभागातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, सेमिनार स्पर्धा होणार आहेत. रांगोळी स्पर्धा 22 डिसेंबरला तर उर्वरित स्पर्धा 23 डिसेंबरला होतील. तसेच 23 डिसेंबर रोजी गणित अधिविभाग व महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान होईल. 28 डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांना गणित शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी गणित अधिविभागात फॅकल्टी ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित केला आहे. सर्व कार्यक्रम राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग तसेच एन.सी.एस.टी.सी., विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्या आर्थिक सहाय्याने होत आहेत, अशी माहिती गणित अधिविभागप्रमुख डॉ. सरिता ठकार यांनी दिली आहे.