अधिवेशन शिस्तबद्धपणे होण्यासाठी जबाबदारीने कामे करा
पूर्वतयारी बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : पुढील महिन्यात बेळगावात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरळीतपणे व शिस्तबद्धतेने होण्यासाठी मागील वर्षाप्रमाणे यंदाही विविध उपसमित्या नेमण्यात आल्या आहेत. उपसमित्यांनी आपल्यावरील जबाबदारी पार पाडताना त्यामध्ये कोणतीही उणीव राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. 12 रोजी सुवर्णसौधमध्ये झालेल्या पूर्वतयारी बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अधिवेशनासाठी येणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पास वितरणाची व्यवस्था करावी.
अधिकारी, कर्मचारी व मार्शलसाठी सुवर्णसौधच्या तळमजल्यात जेवणाची व्यवस्था करावी. त्याचबरोबर सुवर्णसौधच्या बाहेर पेड कॅन्टीन सुरू करण्यात यावे. अधिवेशन काळात विविध संघटनांकडून आंदोलने होत असतात. आंदोलकांसाठी जागा निश्चित करून तेथे पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधांची व्यवस्था करण्यात यावी. आंदोलनाची स्थळे, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार वास्तव्य करणाऱ्या स्थळांवर ऊग्णवाहिकेसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करण्यात यावी. अधिवेशनासाठी येणारे मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था योग्यरितीने करून द्यावी. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व्यासपीठ, आसन आदींची व्यवस्था करण्यात यावी.
दूरवाणी, इंटरनेट व्यवस्था सुलभपणे उपलब्ध व्हावी, यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले, अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पास वितरण करण्यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीsने आवश्यक कागदपत्रे मिळावीत. अधिवेशनासाठी येणाऱ्या वाहनांना दिलेल्या पासची पाहणी करूनच प्रवेश देण्यात येईल. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जैन, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांसह विविध खात्याचे अधिकारी, उपसमित्यांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते.