कारवार जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण
जुन्या इमारतीतील रुग्णांचे-वैद्यकीय सुविधांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर : थर्ड पार्टी अहवाल सरकारला सादर
कारवार : येथील कारवार वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (केआयएमएस) आवारात उभारण्यात आलेल्या 450 बेड्सच्या नवीन रुग्णालय इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. जुन्या जिल्हा रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्याने जुन्या इमारतीतील रुग्णांचे आणि वैद्यकीय सुविधांचे स्थलांतर नवीन इमारतीत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. पौर्णिमा यांनी दिली आहे. सप्टेंबर 8 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंत्यांनी नवीन इमारती संदर्भात थर्ड पार्टी अहवाल सरकारला पाठविला आहे.
या अहवालाच्या आधारे स्थलांतराचे काम हाती घेण्यात आले आहे. नवीन इमारतीबद्दल अधिक माहिती देताना डॉ. पौर्णिमा म्हणाल्या, या इमारतीवर सुमारे 150 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. तथापि, या इमारतीवर सुमारे 198.27 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नवीन इमारत कर्नाटक सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याद्वारे बेंगळूर स्थित बीएसआर इन्फ्राटेक इंडिया लिमीटेड या कंपनीने कॉन्ट्रॅक्टर घेवून उभारले आहे. नवीन इमारतीत ग्राऊंड फ्लोअरसह एकूण पाच मजल्यांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली आहे.
ग्राऊंड फ्लोअरमध्ये रेडीओथेरपी, ट्रामा, आयसीयु, एक्सरे घटकसह अन्य वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली आहे. पहिल्या मजल्यावर प्रसूती वॉर्ड, एनआयसीयु आणि ओबीजी विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शल्यचिकित्सा, रुग्ण, ग्रंथालय आणि कर्मचाऱ्यांच्या खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या मजल्यावर सामान्यशस्त्र चिकित्सा विभाग आणि वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. चौथ्या मजल्यावर पाच अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, रीकवरी खोल्यांची, सीसीटीव्ही, नर्स कॉलींग सिस्टीम, अग्निशमन, युपीएस, लिफ्ट, वायफाय, फॉलस सिलींग आदी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
संमिश्र सरकारकडून सुरुवात
नवीन इमारतीबद्दल माहिती देताना डॉ. पौर्णिमा म्हणाल्या, 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील संमिश्र सरकारच्या कालावधीत आर. व्ही. देशपांडे जिल्हा पालकमंत्री आणि डॉ. शरणप्रकाश यांच्या नेतृत्वाखालील नवीन रुग्णालय इमारत उभारण्यासाठी 150 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. त्याचवेळी टेंडर प्रक्रिया पूर्णत्वाला गेली होती. 2020 मध्ये बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्री असताना पुन्हा टेंडर प्रक्रिया पार पडली होती.
आणखीन रुग्णालयासाठी प्रस्ताव
जुन्या इमारतीतील सर्व साहित्याचे स्थलांतर झाल्यानंतर जुनी इमारत पाडण्यात येईल आणि त्या ठिकाणी 300 बेड्सचे आणखीन एक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे, असे डॉ. पौर्णिमा यांनी सांगितले.