For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-चोर्ला मार्गावरील कुसमळी पुलाचे काम युद्धपातळीवर

11:15 AM Apr 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव चोर्ला मार्गावरील कुसमळी पुलाचे काम युद्धपातळीवर
Advertisement

दुसऱ्या टप्प्यातील डांबरीकरण देखील पूर्णत्वाकडे : पावसाळ्यापूर्वी सदर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांकडून जोरदार हालचाली

Advertisement

वार्ताहर/कणकुंबी

बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यापैकी रणकुंडये ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील डांबरीकरण पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील डांबरीकरण देखील अर्धेअधिक करण्यात आले आहे. तसेच चोर्ला रस्त्यावरील मलप्रभा नदीवर असलेल्या कुसमळी येथील पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाळ्dयापूर्वी सदर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांकडून हालचाली सुरू आहेत. एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. राष्ट्रीय महामार्ग 748 ए.ए. हा रस्ता बेळगाव विभागांतर्गत येत असून राष्ट्रीय महामार्ग विभाग कारवार यांच्यावतीने निविदा मागवण्यात आल्या होत्या. सदर रस्त्याचे कंत्राट हुबळी येथील मेसर्स एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांनी घेतलेले असून रस्त्यासाठी अंदाजे 58.90 कोटी रुपयांची निविदा मागविण्यात आली होती. त्यानुसार 35.30 कोटी रुपयांचे टेंडर एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. बेळगाव ते चोर्ला म्हणजे गोवा हद्द रस्त्यांपैकी 26.130 कि. मी. ते 69.480 कि. मी. म्हणजे रणकुंडये ते चोर्ला असे 43 कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे.

Advertisement

कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पुलाचे काम युद्धपातळीवर 

बेळगाव-गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्याने तो धोकादायक बनला होता. सदर पूल धोकादायक बनल्याने नवीन पूल मंजूर करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून वेळोवेळी केली जात होती. त्यानुसार सदर नदीवरील ब्रिटिशकालीन पूल पूर्णपणे उखडून टाकण्यात आला असून त्याच ठिकाणी दुसरा नवीन पूल बांधण्यात येत आहे. नूतन पुलासाठी वेगळा निधी मंजूर नसून रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजूर झालेल्या निधीतूनच मलप्रभा नदीवरील पूल बांधण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नवीन पूल 90 मिटर लांब तर साडेपाच मिटर रुंद होणार आहे. सध्या नदीत मातीचा भराव टाकून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे. सदर पुलाचे काम पावसाळ्dयापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. या ब्रिटिशकालीन पुलाला सव्वाशे वर्षाचा इतिहास होता.

पर्यावरण-वनखात्यामुळे चोर्ला रस्त्याचे दुपदरीकरण रद्द

डांबरीकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चोर्ला रस्त्यावरील वाहतुकीचा ताण ओळखून रस्त्याचे दुपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 279 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु पर्यावरणप्रेमींनी आणि वनखात्याने रस्त्याच्या रूंदीकरणासाठी आडकाठी घातल्याने सदर रस्त्याचे काम थांबले. राष्ट्रीय महामार्ग कारवार विभागांतर्गत बेळगाव विभागीय राष्ट्रीय महामार्गाच्या सीपीसी मोडवर चोर्ला रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या रस्त्यामुळे बेळगाव आणि गोवा अशी इंधन आणि वेळेची बचत करणारा रस्ता गोव्याला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांपैकी चोर्ला रस्ता हा मुख्य रस्ता समजला जातो.

डांबरीकरणामुळे वाहनांचा वेग वाढणार-धोकादायक वळणे घातक

गेल्या पाच-सहा वर्षापासून या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाल्याने या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेले होते. आता डांबरीकरणामुळे पुन्हा एकदा वाहनांचा वेग वाढणार असून धोकादायक वळणे घातक ठरणार आहेत. अतिवेगामुळे वाहनांच्या अपघातात वाढ होण्याची शक्यताही जास्त आहे.

चोर्ला रस्त्यावरील अवजड वाहतुकीला बंदी  

रणकुंडये ते चोर्ला या 43.5 किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाल्याने तसेच कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील जुना पूल काढून त्या ठिकाणी नूतन पुलाचे काम हाती घेण्यात आल्याने बेळगाव-चोर्ला-गोवा अशी आंतरराज्य अवजड वाहतूक बंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. या मार्गावरून रात्रंदिवस होणारी अवजड वाहतूक रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. अवजड वाहतुकीमुळे बांधकामात व्यत्यय निर्माण होत असल्याने कामकाजाला अडथळा ठरत असल्याने चोर्ला मार्गावरील संपूर्ण अवजड वाहतूक पावसाळ्dयापर्यंत बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. परंतु पोलिसांच्या कृपाशीर्वादाने काही प्रमाणात अवजड वाहतूक चोरी चोरी छुपके छुपके अशाप्रकारे राजरोसपणे सुरू आहे.

Advertisement
Tags :

.