हलगा-मच्छे बायपासच्या कामाला पुन्हा प्रारंभ
शेतकऱ्यांचा विरोध असतानाही कंत्राटदार कार्यरत : झिरो पॉईंट निश्चित केल्यानंतरच कामाला सुरुवात करण्याची मागणी
बेळगाव : बहुचर्चित हलगा-मच्छे बायपासच्या कामाला अखेर महिन्याभराच्या कालावधीनंतर पुन्हा सुरुवात झाली. सोमवारपासून अलारवाड क्रॉसनजीक कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचा विरोध झुगारून झिरो पॉईंट निश्चिती करण्यापूर्वीच रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. सुपीक जमिनीतून हलगा-मच्छे बायपास काढण्यात आल्याने आरेखन करण्यापूर्वीपासून शेतकऱ्यांचा विरोध सुरू झाला. मागील चौदा वर्षांपासून बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. महामार्ग प्राधिकरणाविरोधात शेतकरी उच्च न्यायालयात गेले होते. परंतु, काही महिन्यांपूर्वीच उच्च न्यायालयाने स्थगिती हटविल्याने 7 ऑक्टोबरपासून कामाला सुरुवात झाली. अलारवाड ब्रिजपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांनी विरोध करूनही पोलीस संरक्षणात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने 12 ऑक्टोबरपासून काम थांबविण्यात आले. चिखलातून कशीबशी यंत्रसामग्री बाहेर काढण्यात आली होती. पावसामुळे मागील महिन्याभरापासून बायपासचे काम ठप्प होते. परंतु, आता पाऊस कमी झाल्याने सोमवारपासून महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या कामाला पुन्हा गती दिली आहे.
न्यायालयाचा निकाल न येताच कामाला सुरुवात
बायपासचे आरेखन करताना झिरो पॉईंट चुकीच्या पद्धतीने निश्चित करण्यात आला होता. याविरोधात शेतकरी न्यायालयात गेले. अद्याप त्याचा निकाल आलेला नसताना बायपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. झिरो पॉईंट निश्चित केल्यानंतरच कामाला सुरुवात करण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
उभ्या भातपिकावर फिरविला जेसीबी
जुने बेळगाव शिवारात भातकापणीचे काम जोमात आहे. शेतकऱ्यांना मळणी करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी द्या, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. परंतु, कंत्राटदाराने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता उभ्या भातपिकावर जेसीबी फिरविला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होताना पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले.