कार दरोड्यातील टोळी परभणीमध्ये जाळ्यात
संकेश्वर पोलिसांकडून 2 कोटी 90 लाख रुपये हस्तगत, पोलिसांच्या भूमिकेबद्दल जनतेत साशंकता
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हरगापूरजवळ 3 कोटी 10 लाख रुपये रोकड असलेली कार पळविणारी टोळी महाराष्ट्रात संकेश्वर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी मंगळवारी परभणी येथे दरोडेखोरांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून मोठी रक्कमही जप्त करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी कोल्हापूरहून केरळकडे जाणारी कार अडवून मोठी रक्कम पळविण्यात आली होती. सुरुवातीला दरोडेखोरांनी 3 कोटी 10 लाख रुपये पळविल्याची माहिती मिळाली होती. नेर्लीजवळ दरोडेखोरांनी पळविलेली कार आढळली. त्या कारमध्ये 1 कोटी 56 लाख 50 हजार रुपये आढळून आले होते. जिल्हा पोलीस प्रमुखांनी यासंबंधी सोमवार दि. 18 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन 1 कोटी 1 लाख रुपये जप्त करण्यात आल्याचा खुलासा केला होता. कारमधील तिघा जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. तरीही या प्रकरणाचा तपास अपूर्णच होता.
परभणी येथे दरोडेखोरांची टोळी संकेश्वर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत एकूण 2 कोटी 90 लाख रुपये जप्त झाल्याचे समजते. पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र यासंबंधी अधिकृत माहिती दिली नाही. प्रत्यक्षात 15 नोव्हेंबर रोजी संकेश्वर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करून 75 लाख रुपयांचा दरोडा पडल्याचे संबंधितांनी फिर्यादीत म्हटले होते. 75 लाख रुपयांचा दरोडा पडला आहे, तर गेल्या पाच दिवसांत 2 कोटी 90 लाख रुपये कुठून ताब्यात घेण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर पोलीस यंत्रणेला द्यावे लागणार आहे. हरगापूरजवळ घडलेला दरोडा व त्याचा तपास पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महामार्गावरील याआधी झालेल्या दरोड्यांप्रमाणेच या प्रकरणातही पोलीस यंत्रणा काही लपवते आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.