For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलगा-मच्छे बायपासचे काम सुरूच

10:56 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
हलगा मच्छे बायपासचे काम सुरूच
Advertisement

रात्रभर ट्रकांमधून खडी-मातीची वाहतूक : कंत्राटदार ठाण मांडून

Advertisement

बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. रात्रीच्यावेळीही येळ्ळूर, यरमाळ परिसरातून मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक केली जात आहे. तातडीने हा रस्ता पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयामध्ये असलेली स्थगिती उठविल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाला जोरदार सुरुवात केली असून कंत्राटदार ठाण मांडूनच याठिकाणी आहे. हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी रस्त्यावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई लढली मात्र शेतकऱ्यांना अपयश आले आहे. दडपशाही करत या रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले आहे. आता माती व खडी टाकून रस्त्याची उंची वाढविण्यासाठी कंत्राटदाराची धडपड सुरू झाली आहे. हा रस्ता सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा विविध आंदोलने हाती घेतली. मात्र, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करत या रस्त्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे.

परिसरातील जमिनींना मोठा धोका

Advertisement

हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर त्यावर खडी व माती टाकण्यात येत आहे. मात्र, यामुळे येळ्ळूर, धामणे, शहापूर, मच्छे, मजगाव शिवारातील पाणी अडणार आहे. त्यामुळे या शिवाराला पुराचा धोका निर्माण होणार आहे. सदर शिवारातील पाणी हे दरवर्षी बळ्ळारी नाल्याला जाते. मात्र, बळ्ळारी नाल्याला रस्त्यामुळे पाण्याला वाट मिळणे अवघड झाले आहे. परिणामी या सर्व शिवारातील भात पीक कुजून जाणार, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, बळ्ळारी नाला गाळ, झाडे-झुडपे याने बुजून गेला आहे. त्यातच आता हा रस्ता झाल्याने पाण्याचा निचरा होणे अशक्य होणार आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्यावर पूल बांधावे लागणार आहेत. त्या पुलांच्या बाजूला मोठे नाले तयार करावे लागणार, याचबरोबर पाईप किंवा काँक्रिटदेखील घालावे लागणार आहे. मात्र सध्या मातीचे ढीग पडल्यामुळे त्याठिकाणी पाणी अडणार असून बळ्ळारी नाल्याला पाणी जाणे अशक्य होणार आहे. त्यामुळे येळ्ळूर व इतर शिवारातील पिके पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.