For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वळिवाचा दणका

11:21 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
वळिवाचा दणका
Advertisement

जनजीवन विस्कळीत : टिळकवाडी, अनगोळ, शहापूर भागात रस्त्यावर पाणी

Advertisement

बेळगाव : वळिवाच्या पावसाने शनिवारी शहराला झोडपले. मात्र रविवारी संध्याकाळी वळिवाच्या पावसाने शहराला अक्षरश: दणका दिला आहे. ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या पडणे, गटारीतील पाणी रस्त्यावर येणे, विविध ठिकाणी घरात पाणी शिरणे असे प्रकार झाले. त्यातच वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी पाण्यातून वाट काढत वाहने हाकणाऱ्या वाहनचालकांची व पादचाऱ्यांची अक्षरश: दमछाक झाली. त्यातच वाहतूक कोंडीची भर पडली. बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला असला तरी स्मार्टपणाचा लवलेश कुठेही दिसत नसल्याने नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरामध्ये गारांसह झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. शहरात मनपाकडून अनेक भागात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. सदर कामे वेळेत पूर्ण करण्यात आली नसल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचून रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. अर्धवट गटारींच्या कामांमुळे रस्त्यावर घाण पसरली होती. कंत्राटदारांच्या गलथान कारभारामुळे शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासियांना पावसामुळे गारवा मिळाला आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. तर शनिवारी प्रमाणेच सायंकाळी हजेरी लावलेल्या पावसाने जवळपास दोन तासांहून अधिक काळ पाऊस झाल्याने शहरामधील सखल भागात पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे काही व्यापाऱ्यांना याचा फटका बसला आहे.

रविवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीची उष्णता वाढली होती. दिवसभर उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी आकाशात अचानक ढग जमून सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांसहित धुवांधार पाऊस झाला. यामुळे अनेक परिसरात पाणी साचले होते. सखल भागामध्ये शनिवारप्रमाणेच पावसाचे पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली होती. रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांसह हातगाडीवरील व्यापाऱ्यांची चांगलीच फजिती झाली. तर रविवारची सुटी असल्याने सायंकाळच्यावेळी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही पावसामुळे बराचवेळ अडकून पडावे लागले. छत्री अथवा रेनकोट न घेताच बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना दोन तासाहून अधिक काळ अडकून पडावे लागले. दुचाकी घेऊन खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच फजिती झाली.

Advertisement

टिळकवाडी परिसरात अर्धवट कामांमुळे रस्त्यावर पाणी

टिळकवाडी परिसरात मनपाकडून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. गटारींचे काम सुरू असून अनेक ठिकाणी काम अर्धवट आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्याने पाणी साचून रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. शिवाजी कॉलनी, विवेकानंद कॉलनी, व्हॅक्सिन डेपो रोड, महर्षि रोड, आदी भागातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. यामधूनच नागरिकांना ये-जा करावी लागली. तर अर्धवट कामांमुळे पाण्याचा निचरा न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर पसरले होते. खासबागमध्ये रविवारी बाजार भरतो. पावसाने भाजी विक्रेत्यांची अक्षरश: दैना केली. पावसापासून बचाव करून घेणे त्यांना अशक्य झाले. खडेबाजार शहापूरमध्येही हीच परिस्थिती होती. ताडपत्रीने भाजी झाकून ठेवण्याचा अवकाशही पावसाने दिला नाही. असंख्य भाजी विक्रेत्यांची भाजी वाहून गेली. विक्रीसाठी आणलेले टोमॅटो, बटाटे वाहून जात असताना त्यातही विक्रेत्यांनी शक्यतो जितके होईल तितका भाजीपाला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. शहापूरच्या खडेबाजार मुख्य बाजारपेठेत अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. गटारी तुडुंब भरून पाणी रस्त्यावरून वाहात होते. त्यामुळे गटारीतील कचरा रस्त्यावर पसरला होता. दरम्यान, शहापूर कोरे गल्ली येथे वादळी पावसाने झाड कोसळून दुचाकीचे नुकसान झाले.

पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करा, झाडांच्या जीर्ण फांद्या हटवा, अशी मागणी करत नागरिकांनी मनपा प्रशासनाला निवेदनही दिले होते. परंतु निवडणुकीचे कामकाज म्हणत या कामाकडे दुर्लक्ष झाले. तसेही मनपा नागरी समस्या सोडविण्याबाबत उदासीनच असल्याने या कारभाराचा फटका निष्कारण नागरिकांना बसला आहे. पाऊस सुरू झाला तसा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे रस्त्यावर असलेल्या ख•dयांमध्ये साचलेल्या पाण्याचा अंदाज येऊ शकत नव्हता. याशिवाय रस्त्याचे कामकाज करताना मधेमधे लहान-सहान ख•s आहेत. त्यातून वाट काढणे कसरतीचे झाले. मनपाने जणू वाहनचालकांची आणि शहरवासियांची परीक्षाच घेतली, असा सूर उमटला. कॅम्प येथे महिला पोलीस स्थानकासमोर ट्रान्स्फॉर्मरवर झाडाची फांदी पडल्याने ठिणग्या उडाल्या आणि काही क्षण लोक भयभीत झाले.

झाड कोसळून वाहनांचे नुकसान, अनगोळ परिसरात घरांमध्ये पाणी

दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळून शनिवारी काही दुचाकींचे नुकसान झाले होते. त्याप्रमाणेच रविवारीही दमदार पाऊस झाल्याने संत मीरा स्कूल अनगोळ रोड येथील भलामोठा वृक्ष कोसळल्याची घटना घडली. यामध्ये झाडाखाली लावण्यात आलेल्या दुचाकींसह रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. तर वृक्ष रस्त्यावर पडल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे झाडांची मुळे कमकुवत बनल्याने झाडे कोसळत असल्याचे सांगण्यात येत आहे. राजहंस गल्ली, अनगोळ येथील सखल भागात असणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. त्यामुळे अनगोळ भागातील अनेक गल्ल्यांमध्ये असा प्रकार घडला आहे. हिंदवाडीत रात्री उशिरा ट्रान्स्फॉर्मर कोसळला. मात्र सुदैवाने अनर्थ टळला.

आनंदनगर परिसरात पाणीच पाणी ,घरात पाणी शिरल्याने तारांबळ : नाला काम पूर्ण न केल्यास आंदोलन

रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आनंदनगर परिसरात पाणीच पाणी झाले. पावसाच्या  पाण्याने  रस्ते भरून वाहत होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पाऊस इतका मोठा होता की, परिसरातील संपूर्ण रस्ते व गटारी पाण्याने भरून वाहात होते.

आनंद नगरातील नाल्याचे काम अर्धवट 

आनंदनगर परिसरातील नाल्याचे काम आनंदनगरच्या दुसऱ्या क्रॉसपर्यंत करून अर्धवट स्थितीत सोडल्यामुळे नाल्यातून भरपूर प्रमाणात पाणी येऊन आनंदनगर दुसऱ्या क्रॉसनजीकच्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून तारांबळ उडाली. अनेकांना पावसाचे पाणी काढण्यासाठी कसरत करावी लागत होती. घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची मोठी हानी झाली. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तेव्हा प्रशासनाने आनंद नगरातील या नाल्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा आंदोलन करू असा या परिसरातील  नागरिकांनी इशारा दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष पुरवून तात्काळ ही समस्या सोडवावी अशी मागणीही होत आहे.

Advertisement
Tags :

.