खानापुरात शंभर खाटांच्या दवाखान्याचे काम लवकरच
आरोग्य अधिकारी महेश किवडसण्णावर यांची माहिती : जुनी इमारत जेसीबीद्वारे जमीनदोस्त
खानापूर : खानापूर शहरात शंभर खाटांच्या दवाखान्याच्या इमारतीचे काम येत्या आठ ते दहा दिवसांत सुरू होणार आहे. गेल्या 70 वर्षांपूर्वीपासून रुग्णांच्या सेवेत असलेला दवाखाना पाडवून त्याच ठिकाणी शंभर खाटांच्या दवाखान्याच्या इमारतीचे काम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली असून येत्या काही दिवसात नवीन इमारतीच्या कामाचा पायाभरणी कार्यक्रम होणार असल्याचे आरोग्य अधिकारी महेश किवडसण्णावर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नातून खानापूरसाठी शंभर खाटांचा दवाखाना मंजूर झाला आहे.
या इमारतीसाठी 35 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून तीन मजली इमारत उभारण्यात येणार असून यात रुग्णांसाठी शंभर खाटांची सोय करण्यात येणार आहे. तसेच या दवाखान्यात डॉक्टर, नर्स यांना राहण्यासाठी निवासस्थान, ऑपरेशन थेटर, ऑक्सिजन प्लांट तसेच शवागृह यासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा-सुविधा नव्या इमारतीत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या शिवाय पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या दवाखान्यामुळे खानापूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याने चांगली सोय होणार आहे.
एक वर्षाच्या कालावधीनंतर कामाला मुहूर्त
माता शिशू दवाखान्याचे उद्घाटन दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी आरोग्य मंत्री, पालक मंत्री तसेच माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत शंभर खाटांच्या दवाखान्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य मंत्री गुंडुराव यांनी नवीन इमारतीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र एक वर्षाच्या कालावधीनंतर या कामाला मुहूर्त लागला असून जुनी इमारत पाडविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या काही दिवसात नवीन इमारतीच्या बांधकामास सुरुवात होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी महेश किवडसण्णावर यांनी सांगितले.