कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काश्मीरमध्ये 2 जलप्रकल्प कामांना प्रारंभ

06:45 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 1960 चा सिंधू जलवितरण करार स्थगित केला आहे. त्यामुळे आता भारताने काश्मीरमधून पाकिस्तानला जाणारे नद्यांचे पाणी अडविणाऱ्या उपायांवर कामास प्रारंभ केला आहे. काश्मीरमध्ये 2 जलविद्युत प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले असून हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधू नदी, झेलम नदी आणि चिनाब नदी यांचे पाकिस्तानात जाणारे पाणी 80 टक्क्यांहून अधिक प्रमाणात आडविणे भारताला सहज शक्य होणार आहे.

Advertisement

सलाल प्रकल्प आणि बागलीहार प्रकल्प अशी त्यांची नावे आहेत. या प्रकल्पांमध्ये केला जाणारा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढविला जाणार आहे. यासाठी या धरणांची उंची वाढविली जाणार असून त्यांच्यामधील गाळ काढून त्यांची खोलीही वाढविली जाणार आहे. त्यामुळे या धरणांमध्ये अधिक पाणी साठणार असून धरणांचे दरवाजे बंद केल्यास पाकिस्तानकडे जाणारे पाणी पूर्णत: बंद होऊ शकणार आहे.

गाळ काढण्यासाठी आधुनिक पद्धत

या दोन प्रकल्पांमधील गाळ काढण्यासाठी भारताने आधुनिक रेझरव्हॉयर फ्लशिंगच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे लवकर गाळ बाहेर पडून धरणाची साठा क्षमता वाढते धरणात अधिक प्रमाणात पाणी साठल्यानंतर धरणाचे दरवाजे बंद केल्यास पाणी पुढे सरकत नाही.

काही कालावधी लागणार

सिंधू जलवितरण करार स्थगित केल्याचा त्वरित परिणाम पाकिस्तानवर होणार नाही. तथापि, भारताने काश्मीमधील सर्व प्रकल्पांचे काम त्वरेने पूर्ण केले, तर येत्या तीन ते चार वर्षांमध्ये निश्चितपणे भारत सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठवू शकणार आहे. कराराप्रमाणे पाकिस्तानला या तीन नद्यांचे 80 टक्के पाणी उपयोगात आणण्याची मुभा आहे. तथापि, आता भारताने हा करारच स्थगित केल्याने पाकिस्तानचे जास्तीत जास्त पाणी भारत अडवू शकतो, अशी स्थिती आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये भारताने काश्मीरमध्ये सहा प्रकल्पांवर काम करण्यास प्रारंभ केला आहे. हे प्रकल्प त्वरित पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. भारताने मनावर घेतल्यास 3 वर्षांमध्ये हे प्रकल्प 80 टक्के इतक्या प्रमाणात पूर्ण होऊ शकतात, अशी स्थिती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानचा विरोध

भारताने सलाल आणि बागलीहार येथील धरणांमधील गाळ काढण्यास पाकिस्तानने नेहमी विरोध केला आहे. कारण हा गाळ भारताने पुढे ढकलल्यास तो पाकिस्तानात जातो आणि तेथे पाणीसाठ्याची क्षमता कमी होऊ शकते. सलाल प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता 690 मेगावॅट आहे. तर बागलीहार प्रकल्पाची क्षमता 900 मेगावॅट आहे. मात्र, या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने ही क्षमताही बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. आजवर पाकिस्तानच्या विरोधामुळे गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले नव्हते. पण आता भारताने पाकिस्तानच्या विरोधाला न जुमानता गाळ पुढे ढकलण्याचे काम हाती घेतले आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article