महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन

06:01 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सद्यस्थितीत कामकाज कुठलेही वा कुठल्याही स्वरुपाचे असो, त्यामध्ये असणाऱ्या विविध आव्हानांपोटी व वाढत्या व्यावसायिक स्पर्धेमुळे ताण-तणाव, व्यावसायिक अस्वस्थता इ.मुळे केवळ व्यक्तिगत स्तरावरच नव्हे तर कौटुंबिक सहकारी क्षेत्र व एकूणच कामकाज पद्धतीमध्ये वैयक्तिक जीवनाचे संतुलन राखणे ही बाब फार महत्त्वपूर्ण ठरते. ही बाब सर्वांना व सर्वदूर लागू होते.

Advertisement

यासंदर्भात तपशीलासह सांगायचे म्हणजे कंपनीचे कॉर्पोरेट क्षेत्र, व्यवसाय, व्यवस्थापनातील जबाबदारी, संगणक क्षेत्र, व्यावसायिक प्रवास, मार्केटिंग-विपणन, आर्थिक व्यवहार, ग्राहक संपर्क क्षेत्र, विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या म्हणजेच व्यावसायिक स्पर्धेवर मात करून यशस्वी होण्यासाठी जसे आणि ज्या प्रकारे काम करावे लागते. त्यामुळे अशी कामे करणाऱ्यांचे कामकाजी जीवन निश्चितच असंतुलित होते व त्यामुळेच व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रात विशेषत: मोठ्या वा जबाबदारीच्या पदांवर काम करणाऱ्यांनी आपले काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये संतुलन साधणे आणि कायम राखणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरते.

Advertisement

करिअर प्रवासाच्या विविध टप्प्यांमध्ये व्यक्तिगत स्तरावर पद, पगार, प्रतिष्ठा या मार्गावर केवळ चालणेच नव्हे तर त्यावर अग्रेसर राहणे याला पर्याय नसतो. या प्रवासात यशस्वी निर्णय प्रक्रियेसह काम करण्यावरच व्यवस्थापक म्हणून व्यक्तीचा कस लागतो. कामापोटी स्वत:कडे लक्ष देण्यास बऱ्याचदा वेळ नसतो. परिणामी जबाबदारीच्या कामाचे स्वरुप, कामाचा ताण, प्रसंगी अधिक तास काम करणे व मुख्य म्हणजे घरी परतल्यावरदेखील काम आणि कार्यालयीन कामाचा विचार करणे ही हल्ली नित्याची बाब ठरली असून त्यातूनच अनेकांच्या वैयक्तिक जीवनाचे असंतुलन ही बाब संबंधित मंडळी, त्यांच्या घरचे व संबंधितांसाठी समस्या म्हणून उभी ठाकली आहे.

या संदर्भातला मुख्य मुद्दा म्हणजे वर नमूद केल्याप्रमाणे आज आपल्याभोवती असणाऱ्या कामकाज आणि आपल्या वैयक्तिक जीवनातील असंतुलनाचे मुलभूत कारण काय? यावर मुळातून विचार करणे गरजेचे ठरते. आज हे लक्षात ठेवणे तेवढेच महत्त्वाचे ठरते की बऱ्याचदा असे असंतुलन हे व्यक्ती म्हणून आपल्या व्यक्तिगत आशा-आकांक्षा व अधिकाधिक प्रगती साधण्याच्या प्रक्रियेत व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक व व्यावसायिक इच्छा-आकांक्षांच्या पूर्ततेतून होणे अपरिहार्य ठरते. असे विशेष प्रयत्न केल्यास आयुष्यात ‘जैसे थे’ म्हणजेच यथास्थिती कायम राहू शकते. मात्र आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनपूर्वक व अपेक्षित समाधानासह काम करणे तेवढेच आवश्यक असते.

ही संतुलन प्रक्रिया सुलभ नसली तरी आपल्यासाठी अशक्य नाही ही खुणगाठ बाळगली म्हणजे बऱ्याच बाबी सुलभ होत जातात. मुख्य म्हणजे याची सुरुवात आपण स्वत:पासून करणे आवश्यक व उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ व्यक्ती जेव्हा आपल्या शैक्षणिक पात्रतेनंतर नव्यानेच आपल्या रोजगाराची सुरुवात करते तेव्हा कामाचा पूर्वानुभव नसतो. पुरेसे कौशल्य व कामाची माहिती नसते. त्यामुळे या शिक्षण सराव व व्यवहार या प्रक्रियेत व त्या काळात प्रत्येकच व्यक्तीचे नियोजन, अंमलबजावणीमध्ये योगदान अपरिहार्यपणे आढळते.

मात्र सुरुवातीच्या काळातील ही अस्थिर वा अपुरे कौशल्य आणि सरावाच्या अभावी कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त धावपळ व प्रयत्नानंतर आपल्याला आपले वाढते ज्ञान, सराव व अनुभवाच्या आधारे तथाकथित धावपळीवर मात अवश्यपणे करता येते. अशा प्रकारे मात करण्यासाठी संबंधित व्यक्तीने स्वत: पुढाकारासह प्रयत्न मात्र करायला हवेत, असे करणे आपल्याला आपली कामकाज विषयक जबाबदारी, त्याच्याशी संबंधित आव्हाने, विविध खाचखळगे इ. यशस्वीपणे करतानाच वैयक्तिक व कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे संतुलन करण्यात सहाय्यभूत होऊ शकतात.

कामकाज व वैयक्तिक जीवनाचे संतुलन साधण्यासाठी मुलभूत गरज असते ती कामाच्या निर्धारित कालमर्यादेचे संपूर्णपणे व गांभीर्याने पालन करण्याची. यासाठी वेळ, संसाधने, सामुग्री, जबाबदारीची निश्चिती इ. करणे अपरिहार्य ठरते. हे केले म्हणजे बऱ्याच अंशी उद्दिष्ट साध्य केले जाऊ शकते. काम व त्याला पूरक परिस्थिती व मानसिकता या संदर्भात महत्त्वाची ठरते. या दोन्ही बाबी कामकाजाला अधिक पूरक, उपयुक्त आणि उत्पादकसुद्धा बनवितात. याचे संबंधित व्यक्ती व्यवस्थापकाला दुहेरी फायदे होऊ शकतात. त्यामुळे जबाबदारीचे काम वेळेत, अचूक व निर्धारित पद्धतीने होऊ शकते. परिणामी संबंधितांना इतर काम करण्यावर आपले लक्ष देता येते व कामाचे आणि काम करणाऱ्यांचे नेमके संतुलन साधले जाऊ शकते.

वैयक्तिक मानसिकता व त्याच्याच जोडीला चांगले शरीर आरोग्य या बाबी कामाच्या ठिकाणी व कामाच्या संदर्भात अधिक उपयुक्त बनवितात. यासाठी उत्तम आरोग्य व त्यासाठी पूरक असे खानपान आवश्यक असते. आजकाल विशेषत: विस्तारित वा अतिरिक्त कामाचे तास, भोजनाच्या अनिश्चित वेळा, स्थानिक प्रवासासाठी लागणारा प्रदीर्घ कालावधी यामुळे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनाचे संतुलन ही बाब एक समस्या स्वरुपात पुढे आली आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणून व्यक्तिगत स्वरुपात कर्मचाऱ्यांचे आरोग्य ही बाब म्हणजे नवे आव्हान ठरली आहे.

यासंदर्भात वेळोवेळी झालेली चर्चा, व्यक्त करण्यात येणारी मते, झालेला अभ्यास व संशोधन यावरून कामकाज, कामाचे ताण व त्यापोटी येणारा ताण व परिणामी व्यक्तिपासून व्यवस्थापकांपर्यंतचे विविध स्तरांवर व विविध प्रकारे होणारे असंतुलन कमी करण्यासाठी व परिणामी नियंत्रित करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय फायदेशीर ठरतील-

कामाच्या दरम्यान ताण येऊन अस्वस्थता बऱ्याचदा येते व त्यातूनच कामकाजी मंडळीच्या व त्यातही जबाबदारीसह अधिकारपदावर काम करणाऱ्यांना विविध स्वरुपातील असंतुलनाचा सामना करावा लागतो. यावर तोडगा म्हणून संबंधित व्यक्तीने अशी परिस्थिती का आणि कशामुळे निर्माण होते याचा पडताळा करुन घ्यायला हवा. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा तणाव निर्माण करणाऱ्या वा देणारे मुद्दे आणि कारणे यांचे स्वत: व त्रयस्थपणे विश्लेषण करून त्यावर काय आणि कशाप्रकारे उपाययोजना करता येईल, याचा विचार करून अशा अंमलबजावणीची मानसिक तयारी करणे.

स्वत:च्या भावना समजून घेणे- काम करताना विविध मुद्दे व पैलुंवर विचार करावा लागतो. या प्रक्रियेत भावनांचा प्रभाव व्यक्तीवर अपरिहार्यपणे पडतो. बऱ्याचदा आपल्या मनाविरुद्ध विचार करावा लागतो वा निर्णयपण घ्यावा लागतो. त्यामुळे मानसिक तणाव अपरिहार्यपणे होतो. अशावेळी वस्तुस्थिती व व्यावहारिक स्थिती याचा ताळमेळ घातल्यास संतुलन साधले जाऊ शकते.

प्राथमिकतांना प्राधान्य देणे- हल्ली एकाच व्यक्तीने विविध कामे करणे, अचानकपणे एखादे नवे काम करणे, प्रसंगी इतरांच्या गरजांनुरुप काम करावे लागणे या बाबी होतच असतात. यातून कामाचा व मानसिक ताण वाढतो. या सर्व बाबींना संतुलित ठेवण्यासाठी कामातील महत्त्वाच्या बाबींना प्राधान्य देणे हा उपाय उपयोगी ठरतो.

उपयुक्त कामकाज पद्धतींची अंमलबजावणी- काम करणाऱ्यांचा अनुभव फार महत्त्वाचा असतो. आपल्या कामामध्ये सुधारणा वा सुकरता आणण्याचे काम ते काम प्रत्यक्षात करणारेच अधिक प्रभावीपणे करू शकतात, असे केल्यास काम सोपे, सुकर व उत्पादक होते व प्रसंगी होणारा ताण-तणाव सहजपणे टाळता येतो. कामावर आत्मविश्वासासह नियंत्रण- आपल्या कामाचे क्षेत्र व आवाका हे लक्षात घेऊन काम केल्यास विशेषत: एकूणच कामकाजावर आत्मविश्वासासह नियंत्रण ठेवता येते, असे केल्यास एकूणच कामाचे संतुलन साधले जाऊ शकते. कार्यलयाबाहेरचे काम स्वरुप आणि उपाय- कार्यालय किंवा कामाचे ठिकाणी या परिघाबाहेर कामाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे काम आणि त्यामुळे होणारी धावपळ-ताण काही प्रमाणात नियंत्रित करण्यासाठी काम, कामाचे ठिकाण, कामाचे स्वरुप याला शिस्त व निर्धारित पद्धत लावणे आवश्यक असते.

वरील बाबी प्रसंगी लहान वा नित्याच्या वाटत असल्या तरी त्याला योग्य व निर्धारित कार्यपद्धतीसह अंमलात आणणे हाच ठोस उपाय ठरतो व तेच लक्षात घेणे आवश्यक ठरते.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article