For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काम व क्रोध लोकांना त्यांच्या ताब्यात ठेवतात

06:03 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
काम व क्रोध लोकांना त्यांच्या ताब्यात ठेवतात
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पांचा उपदेश अगदी साधा व सरळ आहे. ते राजाला म्हणतात, नेमून दिलेलं काम सचोटीनं कर आणि फळाची अपेक्षा न करता मला अर्पण कर. हे ऐकून राजाला शंका येते की, असं जर आहे तर त्या प्रमाणे वागायचं सोडून मनुष्य चुकीच्या मार्गाने जाऊन पापाचरण का करतो? बाप्पा राजाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत ते असं,

कामक्रोधौ महापापौ गुणद्वयसमुद्भवौ ।

Advertisement

नयन्तौ वश्यतां लोकान् विद्ध्येतौ द्वेषिणौ वरौ ।। 37।।

अर्थ-रज व तम या दोन गुणांपासून उत्पन्न झालेले, अत्यंत पापयुक्त काम व क्रोध लोकांना त्यांच्या ताब्यात ठेवतात. हे माणसाचे प्रबळ शत्रू आहेत असे जाण.

विवरण-मनुष्यस्वभाव हा सत्व, रज आणि तम या तीन गुणांपासून तयार होतो. वरीलपैकी कोणत्यातरी एका गुणाचा त्याच्या स्वभावात जोर असतो आणि त्या गुणाला अनुरूप अशी वर्तणूक माणसाकडून होते. माणसात सत्वगुणाचा जोर असेल तर त्याच्या मनावर आत्मज्ञान आणि त्याचा प्रकाश ह्यांचा प्रभाव असतो. त्यामुळे तो ईश्वराने दिलेलं काम चोख करून ते ईश्वराला अर्पण करून स्वस्थ राहतो. अशा माणसाचं आयुष्य बिनाकटकटीचं होऊन शेवटी त्याला सदगती मिळते.

रजोगुणी मनुष्य अधिक फळाची इच्छा धरतो. त्यासाठी सदैव धडपडतो. त्यासाठी स्वत:च्या डोक्याने जास्तीचे काम करत राहतो. त्याला हवं असलेलं फळ मिळण्यासाठी म्हणजे त्याची इच्छापूर्ती होण्यासाठी अनिष्ट मार्गाने जायची सुद्धा त्याची तयारी असते. आपल्याला अपेक्षित असलेलं कर्माचे फळ मिळवायचंच आहे ह्या इर्षेपोटी धर्म, अधर्म ह्या कशाचाही विचार तो करत नाही. त्यामुळे त्याच्याहातून कर्माबरोबर अकर्मही घडतं. त्यातून त्याच्या हातून आणखी आणखी पापाचरण घडत राहतं.तमोगुणी मनुष्य तो करतोय तेच बरोबर आहे असं समजत असतो. स्वत:चा हेका चालवण्यासाठी वेळ पडल्यास अधर्माचरणही करत असतो कारण त्याला वाटत असतं की तो करत आहे हेच धर्माचरण आहे. त्याला सद्गुरूंचा उपदेश म्हणजे या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायची गोष्ट वाटते. तू वागतोयस हे चुकीचं आहे असं कुणी सांगितलं तर त्याला अत्यंत राग येतो. त्याच्या अधर्माचरणात कुणी आडवं आलं तर त्याच्यावरील रागानं त्याचं वाईट करण्यात त्याला कोणताच विधिनिषेध वाटत नाही. अशा पद्धतीनं तो पापांच्या राशी रचत आयुष्य वाया घालवतो.

रजोगुणी मनुष्य अतोनात इच्छा मनात धरून त्यांच्या पूर्तीसाठी, तर तमोगुणी मनुष्य मी म्हणतोय, मी करतोय तेच बरोबर आहे असं सांगत असतो आणि त्याला जो आडवा येईल त्याच्यावर राग धरून, त्याला नष्ट करून पापाचरण करत असतो. रजोगुणी माणसाला होणाऱ्या इच्छा किंवा तमोगुणी माणसाला येणारा अनावर क्रोध यावर अधिक भाष्य बाप्पा पुढील श्लोकात करत आहेत.

आवृणोति यथा माया जगद्बाष्पो जलं यथा ।

वर्षामेघो यथा भानुं तद्वत्कामो खिलांश्च रुट् ।। 38।।

अर्थ-ज्याप्रमाणे माया जगाला, बाष्प जलाला, वर्षाकालाचा मेघ सूर्याला आच्छादित करतो त्याप्रमाणे काम व क्रोध सर्व प्राण्यांना आच्छादित करतात.

विवरण-काम म्हणजे इच्छा. या इच्छा आणि क्रोध यांचा जगावर जबरदस्त पगडा असतो. त्यासाठी उदाहरण म्हणून बाप्पा सांगतात, ज्याप्रमाणे मायेने जगाला वेढलं आहे, तसेच बाष्प पाण्याला वेढून टाकते किंवा पावसाळ्यात ढग सूर्याला झाकोळून टाकतात त्याप्रमाणे काम आणि क्रोध यांनी जगाला वेढून टाकले आहे. वेढून टाकणे म्हणजे कडेकोट बंदोबस्तात ठेवणे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.