कथा हरणांची........
जंगलातला सगळ्यात सुंदर देखणा आणि चपळ प्राणी म्हणजे हरीण, त्याच्यातही विविध जाती, प्रजाती आहेतच. पण सगळ्या लोभसवाण्या, कोणाची शिंगं छान तर कोणाच्या हालचाली छान, कुणाचं पळणं दिमाखदार तर कुणाचं बघणं बहारदार. मराठी भाषा पण या हरणांच्या उपमानमुळे समृद्ध झाली..हरणासारखे डोळे, हरीणीची चाल, सीतेला आवडलेला कांचन मृग, कस्तुरी मृग इ. प्राणीसंग्रहालयात गेलो तरी आपण हरीण बघायला आवर्जून थांबतोच. आपल्या सगळ्यांनाच आवडणारा, स्वच्छ आणि देखणा, ऐटबाज प्राणी आणि त्याच्या गोष्टी तर खूप मन लावून ऐकतो. अशा या हरणाबद्दलच्या गोष्टी इंग्रजी कथांमधूनही भरपूर आलेल्या आहेत. अशीच एक कथा, म्हणजे रोहंता आणि बांबी.... शाळेत ऐकताना डोळ्यांना अगदी पाण्याच्या धारा लागायच्या. घरी येऊन आजीला कधी सांगू असं झालेलं असायचं. पण आमच्या कथा ऐकल्यानंतर मात्र आजी तिच्या पुराणातल्या कथा सांगायला लागायची. आमच्याकडचं शिवलीलामृत या पुराणांमध्ये अशीच हरणाची गोष्ट आहे. ज्याच्यामुळे पारध्याला भगवंताचे दर्शन झालं, खरं तर त्यावेळी देखील एका हरणाला मारायला आलेला हा पारधी हरणाचं आणि त्याच्या कुटुंबाचे प्रेम बघून अतिशय सद्गतीत होतो. आणि हरणाला मारण्यापासून परावर्तीत होतो. या कथा ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा मनात या प्राण्याबद्दल अतिशय जिव्हाळा निर्माण होतो.
खरंतर या हरणाला पारधी मारणार या कल्पनेने बाकीच्या हरणांनी लांबून गंमत बघितली असती तरी ठीक होतं, पण ते प्राणी होते आणि त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी या हरणाला शेवटपर्यंत साथ दिली. पण माणसाचं मात्र तसं नसतं. समोर एखाद्याचा जीव जात असला तरीही तो त्याचा व्हिडिओ बनवण्यात किंवा लांबून गंमत पाहण्यातच धन्यता मानतो. तरीही आम्ही माणसांच्या कथा किंवा प्राण्यांच्या कथा एकत्र करण्याचा प्रयत्न सतत करत असतो. दोघांचे गुणधर्म अगदी भिन्न, त्याउलट प्राण्यांमधली माणुसकी जास्त मोठी, जी माणसांमध्ये अगदी शून्य होत चाललेली आहे. म्हणूनच या कथा आवर्जून पुढच्या पिढीला सांगायला हव्या.
एकदा एका जंगलात एक हरीण आणि हरणी दोघेही आनंदात आपलं जीवन व्यतीत करत असतात. कालांतराने त्या जंगलामध्ये खूप मोठा दुष्काळ पडतो. झाडावरचा पालाही नाहीसा होतो आणि पाणवठ्यावरील पाणीदेखील हळूहळू नाहीसं व्हायला लागतं. पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात सगळेच प्राणी पक्षी दूरवर जायला लागतात. तसेच ही हरणांची जोडीदेखील जायला लागते. खूप लांब पळाल्यानंतर तहानेने व्याकुळ झालेले हे दोन्ही जीव पाण्याचा शोध करत असतात. पावलं टाकता येतील तसे चालत असतात. एवढ्यात त्यांना एक थंडगार वाऱ्याची झुळूक जाणवते. त्या दिशेला ते बघतात. तिथे अगदी एका पाणवठ्यावर ओंजळभर पाणी शिल्लक राहिलेलं असतं. आता हे पाणी कोणी प्यायचं? कारण एकालाच पुरेल एवढेच ते पाणी असतं. हरीण हरणीला म्हणतो तू पी आणि हरणी म्हणते, तू पी. दोघेही एकमेकांना जगवण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी दोघेजण एक एक घोट पाणी पिऊन तिथेच स्तब्ध उभे राहतात. कारण दोघांच्याही शरीरातल्या पाण्याचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळे दोघेही त्या ठिकाणी मृत्यूला पावतात. अशी ही जीवापाड प्रेम करणाऱ्या हरणांची कथा. मृत्यू देखील एकदमच स्विकारतात. कथा वाचली आणि लक्षात आलं असं शहाणपण माणसातसुद्धा यायला हवं. कारण एकमेकांना आनंदाने जगणं देखील तो दुरापास्त करायला लागलाय, मृत्यू येणं लांबच.