महिला वर्ल्ड कप : न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया लढत आज
वृत्तसंस्था/ इंदूर
सात वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया आज बुधवारी येथे होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषकातील सामन्यात बऱ्यापैकी अनुभवी न्यूझीलंडविऊद्ध विजय मिळवून आपल्या जेतेपदाच्या बचावाची सुऊवात करण्यास उत्सुक असेल. टी-20 विश्वविजेत्या किवी संघात कठीण लढत देण्याची क्षमता असली, तरी ऑस्ट्रेलियासमोर मोठे अंतर्गत आव्हान आहे. त्यांच्याकडे भरपूर प्रतिभा आणि पर्याय आहेत. पण संघाच्या गरजांनुसार त्यांचे संतुलन साधणे ही डोकेदुखी आहे
डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी मोलिनेक्स आणि लेगस्पिनर जॉर्जिया वेअरहॅम त्यांच्या दुखापतींमधून बऱ्या झाल्या आहेत आणि आता ऑस्ट्रेलियन संघाला या सिद्ध कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अकरा जणांमध्ये कसे सामावून घ्यायचे याचा विचार करावा लागेल. ऑस्ट्रेलियन थिंक-टँकला विचार करावा लागेल की, वेअरहॅम आणि अलाना किंग या दोन लेगस्पिनरना घेऊन पुढे जायचे की, त्यांच्या माऱ्यात अधिक विविधता आणण्यासाठी मोलिनेक्सला जोडायचे. त्यांचा वेगवान गोलंदाजी विभागही प्रतिभेने समृद्ध आहे. मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, एलिस पेरी, तहलिया मॅकग्रा आणि डार्सी ब्राउन यासारख्या खेळाडू संघात स्थान मिळविण्यासाठीच्या शर्यतीत आहेत.
त्यांच्याकडे फलंदाजीमध्येही अनेक मॅचविनर्स आहेत. बेथ मुनी, फोबे लिचफिल्ड आणि अॅश्ले गार्डनर यांचा त्यात समावेश आहे. पण कर्णधार अॅलिसा हिलीला आघाडीवर राहून नेतृत्व करावे लागेल. अलीकडेच ब्रिस्बेन येथे भारताविऊद्ध 87 चेंडूंत 101 धावा करणाऱ्या जॉर्जिया वोलच्या समावेशामुळे त्यांच्या फलंदाजीला आणखी बळकटी मिळाली आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाने अलीकडेच द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत यजमान भारताला 2-1 असे हरवून स्पर्धेसाठी त्यांची तयारी दाखवली आहे. त्यामुळे, या ऑस्ट्रेलियन संघाला हरवण्यासाठी न्यूझीलंडला विशेष प्रयत्न करावे लागतील आणि ते त्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत.
गेल्या वर्षी यूएईमध्ये मिळविलेल्या टी-20 जेतेपदामुळे उपखंडातील परिस्थितीत चांगली कामगिरी करण्याचा न्यूझीलंडचा विश्वास वाढला असेल. पण मार्चमध्ये मायदेशात श्रीलंकेचा सामना केल्यापासून संघ एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही आणि 2024 पासून त्यांनी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या 50 षटकांच्या मालिका गमावल्या आहेत. तथापि, ऑस्ट्रेलियन संघ त्यांना हलके घेण्यास तयार नसेल आणि त्यांना हे माहित असेल की, किवी संघाने गेल्या वर्षी टी-20 विश्वविजेतेपद मिळविताना 10 सामन्यांची पराभवाची मालिका उलथवून टाकली होती.
त्या संघाकडे कर्णधार सोफी डेव्हिन, सुझी बेट्स, ली ताहुहू, अमेलिया केर आणि मॅडी ग्रीन यासारख्या अनुभवी खेळाडूंची चांगली संख्या आहे. ग्रीनने इंग्लंडविऊद्ध सराव सामन्यात शतक झळकावले. जॉर्जिया प्लिमर, पॉली इंग्लिस, एडन कार्सन आणि इझी गेझ यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे तऊणाईची ताकदही आहे. न्यूझीलंडने अबू धाबी तसेच चेन्नई येथील सीएसके अकादमीमध्ये व्यापक तयारी शिबिरे आयोजित केली होती. तसेच बेंगळूररमध्ये संघ काही सराव सामने खेळलेला आहे. न्यूझीलंडला आता ऑस्ट्रेलियावर मात करण्याच्या दृष्टीने आपण पुरेशी तयारी केली आहे असे वाटत असेल.
सामन्याची वेळ : दु. 3 वा.