महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आजपासून
संयुक्त अरब अमिरातीत रंगणार लढती, आज स्कॉटलंडचा सामना बांगलादेशशी तर श्रीलंकेचा पाकिस्तानशी,
वृत्तसंस्था/ दुबई
शारजाह येथे आज गुऊवारी दोन सामन्यांसह प्रारंभ होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे अतुलनीय वर्चस्व संपवण्यासाठी भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ प्रयत्नशील असतील. आजच्या दुपारच्या सामन्यात बांगलादेशचा सामना स्कॉटलंडशी होणार आहे. त्यानंतर आशियाई संघ पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होईल.
बांगलादेशातील राजकीय अशांततेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला 10 संघांची ही स्पर्धा ‘यूएई’मध्ये हलवणे भाग पडले आहे. एकूण नऊपैकी सहा स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा एकदा केंद्रस्थानी असेल. त्यांना हरवेणे हे इतर प्रतिस्पर्ध्यांचे प्रमुख लक्ष्य राहणार आहे. इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेने वारंवार दाखवून दिले आहे की ऑस्ट्रेलियन किल्ला सर केला जाऊ शकतो. परंतु विश्वचषक स्पर्धांचा विचार केल्यास हा संघ अजिंक्य राहिलेला आहे.
18 महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील विजयानंतर मेग लॅनिंगने निवृत्ती घेतल्याने ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राखण्याची जबाबदारी एलिसा हिलीवर येऊन पडलेली असून तिच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाला भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंकासोबत ‘अ’ गटात समाविष्ट करण्यात आले आहे, तर ‘ब’ गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
ऑस्ट्रेलियाला यावेळी इंग्लंकडूनही टक्कर मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी महिला अॅशेसदरम्यान मुख्य प्रतिस्पर्ध्याविऊद्ध मिळविलेल्या मालिका विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. संयुक्त अरब अमिरातीमधील खेळपट्ट्या फिरकीपटूंना पसंती देतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इंग्लंड आपल्याकडील फिरकीपटूंचा वापर प्रभावीपणे करण्यावर भर देण्याची शक्यता आहे. अनुभवी नॅट-सायव्हर ब्रंट फलंदाजी विभागात त्यांना बळ देईल. उन्हाळ्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा व्हाईटवॉश केलेला असल्याने इंग्लंडला यावेळी त्यांच्या संधींबद्दल प्रचंड आत्मविश्वास असेल.
ऑस्ट्रेलियाला नेहमी आव्हान देणारा, पण आतापर्यंत अंतिम अडथळा पार करू न शकलेला दुसरा संघ म्हणजे भारत आहे. आशिया चषक फायनलमध्ये श्रीलंकेकडून आश्चर्यचकित झाल्यानंतर भारत आता या स्पर्धेत उतरत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेची भरपूर तयारी केली आहे. 2018 च्या टी-विश्वचषकापासून संघाचे नेतृत्व करणारी हरमनप्रीत यावेळी प्रचंड दडपणाखाली असेल. कारण आणखी एक निराशाजनक कामगिरी घडल्यास तिचा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपुष्टात येऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकेने घरच्या पाठिंब्याच्या लाटेवर स्वार होऊन गेल्या वर्षी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. यावेळी ते आणखी चांगली कामगिरी करण्याच्या तयारीत व्यस्त राहिलेले आहेत. दक्षिण आफ्रिकेने यंदा ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली आणि त्यांना श्रीलंकेकडूनही पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी या महिन्याच्या सुऊवातीला पाकिस्तानवर विजय मिळवण्यापूर्वी बांगलादेश, भारत, न्यूझीलंड यांच्यासोबतच्या मालिका बरोबरीत सोडविल्या.
आजचे सामने
स्कॉटलंड वि. बांगलादेश
वेळ : दु. 3.30
लंका वि. पाकिस्तान
वेळ : रात्री 7.30
ठिकाण : शारजाह
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क