वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी
95 चेंडूत 171 धावांची आतषबाजी,आशिया चषकात भारताचा विजयारंभ
वृत्तसंस्था/ दुबई
युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर भारतीय संघाने युवा आशिया चषक स्पर्धेत यजमान युएईचा 234 धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 433 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना युएई संघाला 7 बाद 199 धावापर्यंत मजल मारता आली. अवघ्या 95 चेंडूत 171 धावांची आतषबाजी करणाऱ्या वैभवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताची पुढील लढत दि. 14 रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल.
प्रारंभी, युएईच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 433 धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे, 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या वनडेतील या सर्वाधिक धावा ठरल्या. कर्णधार आयुष म्हात्रे 4 धावा करुन माघारी परतला. यानंतर वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्ज यांनी दुसऱ्या विकेटसाठी 212 धावांची भागीदारी केली. आरोनने 73 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 69 धावांचे योगदान दिले. वैभवने मात्र जोरदार फटकेबाजी करताना युएईच्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. त्याने अवघ्या 95 चेंडूत 9 चौकार आणि 14 षटकारासह 171 धावांची वादळी खेळी साकारली. वैभवच्या या खेळीमुळेच टीम इंडियाला 400 धावांचा टप्पा गाठता आला. याशिवाय, विहान मल्होत्रा व वेदांत त्रिवेदी यांनी मोर्चा सांभाळला. विहानने 55 चेंडूंत 69 धावा केल्या, तर वेदांतने 38 धावा केल्या. अभिज्ञान कूंडूने 17 चेंडूंत 32 धावांची नाबाद खेळी केली, तर कनिष्क चौहानने 12 चेंडूंत 28 धावा फटकावल्या.
यूएईचा 234 धावांनी पराभव
विजयी धावांचा पाठलाग करताना युएई संघाची 6 बाद 53 अशी स्थिती झाली होती. मात्र पृथ्वी मधू, उद्दीश सुरी आणि सालेह अमीन या त्रिकुटाने संघर्ष केला. या तिघांना यूएईला जिंकून देणं जमलं नाही, मात्र या तिघांनी चिवट झुंज दिली. यूएईसाठी प्थ्वीने 87 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. तर उद्दीश आणि सालेह या जोडीने सामना संपेपर्यंत आठव्या विकेटसाठी 74 बॉलमध्ये 61 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. उद्दीशने शानदार खेळी साकारताना 106 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 78 धावांचे योगदान दिले तर आमीनने नाबाद 20 धावा केल्या. यूएई संघाला 7 बाद 199 धावापर्यंत मजल मारता आली. टीम इंडियासाठी दीपेश देवेंद्रनने 2 विकेट्स घेतल्या. तर किशन कुमार सिंग, हेनिल पटेल, खिलन पटेल आणि विहान मल्होत्रा या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
भारत 50 षटकांत 6 बाद 433 (वैभव सूर्यवंशी 95 चेंडूत 171, आरोन 69, विहान मल्होत्रा 69, वेदांत त्रिवेदी 38, अभिज्ञान नाबाद 32, उद्दीश सुरी आणि युग शर्मा प्रत्येकी 2 बळी)
युएई 50 षटकांत 7 बाद 199 (पृथ्वी मधू 50, उद्दीश नाबाद 78, सालेह आमीन नाबाद 20, दीपेश देवेंद्रन 2 बळी, किशन सिंग, हेनिल पटेल, विहान आणि खिलन पटेल प्रत्येकी 1 बळी).
वैभवची आतषबाजी, अवघ्या 95 चेंडूत केल्या 171 धावा
भारताचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. वैभवने यूएईविरूद्धच्या सामन्यात वादळी शतकी खेळी साकारताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 95 चेंडूत 171 धावांच्या खेळीच्या जोरावर अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याची ही खेळी 9 चौकार आणि 14 षटकारांनी बहरलेली होती. या खेळीतील षटकारांच्या जोरावर 14 वर्षीय वैभवने 17 वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. 19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आता वैभव सूर्यवंशीच्या नावे झाला आहे. याआधी युवा एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या मायकेल हिल याच्या नावे होता. 2008 मध्ये नामिबीयाविरुद्धच्या सामन्यात त्याने 12 षटकार मारले होते. आता 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 14 षटकारांसह 17 वर्षांपूर्वीचा हा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
युवा भारतीय संघाचा विक्रम
आशिया कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारताना भारतीय संघाने अंडर 19 वनडेतील आपला रेकॉर्ड आणखी भक्कम केला आहे. याआधी भारतीय संघाने दोन वेळा वनडेत 400 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत तिसऱ्यांदा युवा टीम इंडियाने 400 पारचा डाव साधला. भारतीय संघाशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांनी प्रत्येकी एकदा 400 पेक्षा अधिक धावसंख्या उभारली आहे. फक्त भारतीय संघाने तीन वेळा हा डाव साधला आहे.