बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी महिला टी-20 संघ घोषित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पिनर आशा सोभना व तडाखेबंद फलंदाज सजना सजीवन यांनी प्रथमच भारतीय महिला टी-20 संघात निवड करण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी त्यांना संघात स्थान मिळाले आहे. 28 एप्रिलपासून या मालिकेची सुरुवात होईल.
अलीकडेच झालेल्या महिलांच्या प्रिमियर लीगमध्ये सजना सजीवन व लेगस्पिनर सोभना यांनी प्रभावी कामगिरी करून लक्ष वेधून घेतले होते. दुसऱ्या डब्ल्यूपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या आरसीबी संघातून खेळताना सोभनाने चमकदार प्रदर्शन करीत 10 सामन्यांत 15.42 च्या सरासरीने 12 बळी मिळविले. सजनाने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते. अलीकडेच पुणे येथे झालेल्या आंतरविभागीय रेडबॉल स्पर्धेतही तिने चांगली कामगिरी करताना उपांत्य सामन्यात तिने 74 धावांची खेळी केली होती. याशिवाय ती ऑफस्पिन गोलंदाजीही करते.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत भारतीय महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. या वर्षी बांगलादेशमध्येच महिला टी-20 वर्ल्ड कप होणार असल्याने ही मालिका भारतासाठी उपयुक्त ठरणार आहे. सर्व पाचही सामने सिल्हेत येथे खेळविले जातील. आरसीबीची आणखी एक स्टार परफॉर्मर श्रेयांका पाटीलचाही या संघात समावेश आहे तर दयालन हेमलताने संघात पुनरागमन केले आहे. हेमलताने ऑक्टोबर 2022 मध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला होता. रेणुका सिंग ठाकुर, युवा तितास साधू व पूजा वस्त्रकार या संघातील वेगवान गोलंदाज असतील. डावखुरी स्पिनर सायका इशाकने गेल्या वर्षी डब्ल्यूपीएल गाजविल्यानंतर तिला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले होते. या मालिकेतील सामने 28, 30 एप्रिल, 2, 6, 9 मे रोजी होणार आहेत.
बांगलादेश मालिकेसाठी निवडलेला भारतीय महिला टी-20 संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, सजना सजीवन, रिचा घोष, यास्तिका भाटिया, राधा यादव, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, अमनजोत कौर, श्रेयांका पाटील, सायका इशाक, आशा सोभना, रेणुका सिंग ठाकुर, तितास साधू.