महिला प्रीमियर लीग आजपासून
आरसीबी-गुजरातमध्ये शुभारंभी लढत
वृत्तसंस्था/वडोदरा
महिला प्रीमियर लीग आज शुक्रवारी येथे गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याने सुरू होत असून ही तिसरी आवृत्ती भारताच्या उदयोन्मुख क्रिकेट प्रतिभेला चालना देताना अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे कौशल्य प्रदर्शित करण्यास सज्ज झाली आहे. सामना रात्री 7.30 पासून सुरू होईल. जागतिक सुपरस्टार्सनी या स्पर्धेचे मूल्य भरपूर वाढविलेले असले, तरी लीगचे खरे यश देशांतर्गत खेळाडूंच्या उदयात आहे. पहिल्या दोन हंगामात श्रेयंका पाटील आणि सायका इशाकसारख्या अनेक देशी प्रतिभावान खेळाडूंनी दबाव न घेता प्रगती केली. त्यातून त्यांना राष्ट्रीय संघाची दारे उघडी होऊन त्यांनी भारतातर्फे पदार्पणही केले.
महिला प्रीमियर लीगच्या प्रत्येक हंगामासोबत उदयोन्मुख भारतीय खेळाडूंची यादी वाढत चालली आहे. अॅलिसा हिली, सोफी मोलिनेक्स आणि केट क्रॉस यासारख्या परदेशी स्टार दुखापतींमुळे या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. त्यामुळे हा हंगाम अनुभवी देशी खेळाडू आणि नवोदित खेळाडूंना चमकण्याची सुवर्णसंधी प्रदान करेल. भारताची कर्णधार म्हणून मी या हंगामासाठी खूप उत्सुक आहे. कारण अनेक देशी क्रिकेटपटूंनी या स्पर्धेसाठी तयारी केली आहे, असे हरमनप्रीत कौरने म्हटले आहे.
भारतीय संघातून वगळण्यात आलेली, मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये राहिलेली भारताची सलामीवीर शफाली वर्मा दिल्ली कॅपिटल्सतर्फे भरीव कामगिरी करण्यास उत्सुक असेल. कारण जुलैमध्ये इंग्लंड दौरा आणि नंतर मायदेशात एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने ती राष्ट्रीय संघात पुनरागमन करू पाहत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रसिद्धी मिळविलेली आणि वेगवान गोलंदाजी करणारी अष्टपैलू खेळाडू काश्वी गौतम हिलाही सर्वोत्तम संघांविऊद्ध स्वत:ला सिद्ध करण्याची यातून संधी मिळेल.
या स्पर्धेत वडोदरा आणि लखनौ या दोन नवीन ठिकाणांची भर घालण्यात आली आहे. ‘आयपीएल’सारखीच पूर्णत: ‘होम अँड अवे’ पद्धत लागू करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. दरम्यान, गतविजेत्या आरसीबीसमोर त्यांचे जेतेपद राखण्याचे कठीण आव्हान आहे. गेल्या हंगामात खेळलेल्या त्यांच्या सोफी डेव्हिनने आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. ती, मोलिनेक्स आणि दुखापतग्रस्त केट क्रॉस यासारख्या त्यांच्या प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत. याव्यतिरिक्त, स्टार अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी, श्रेयंका पाटील आणि आशा शेभना या देखील दुखापतींमधून सावरत आहेत.
या अडचणींवर मात करण्याची ‘आरसीबी’ची क्षमता त्यांना त्यांचा मुकुट यशस्वीरीत्या राखता येईल की नाही हे ठरविण्याकामी महत्त्वाचा ठरेल. ‘गेल्या वर्षी संघात असलेले आमचे बहुतेक खेळाडू दुखापतींमुळे या हंगामात उपलब्ध नाहीत. सोफी (डेव्हिन) ही जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे, म्हणून आम्हाला तिची उणीव नक्कीच जाणवेल’, असे आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने म्हटले आहे.
दोन वेळा उपविजेता राहिलेला दिल्ली कॅपिटल्स हा स्पर्धेतील सर्वांत सातत्यपूर्ण संघ आहे आणि अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागण्याची निराशा यावेळी संपुष्टात आणण्यास संघ उत्सुक असेल. दिल्लीकडे शफाली वर्मा, मेग लॅनिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड आणि मॅरिझॅन कॅप यांचा समावेश असलेली मजबूत फलंदाजी आहे. त्यांचा गोलंदाजीतील माराही तितकाच जबरदस्त आहे, त्यांच्याकडे शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, तितस साधू, जेस जोनासेन आणि राधा यादव यासारख्या अनुभवी खेळाडू आहेत. गुजरात जायंट्सचे नेतृत्व यावेळी अॅश्ली गार्डनर या नवीन कर्णधाराकडे असेल.
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स 18 नेटवर्क, वेळ : 19.30 पासून