महिलांची प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धा 20 डिसेंबरपासून
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2025-26 च्या फुटबॉल हंगामातील महिलांची प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धा 20 डिसेंबरपासून कोलकाता येथे सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळविली जाणार आहे. 20 डिसेंबरला या स्पर्धेतील सलामीचा सामना सेतू एफसी आणि किकस्टार्ट एफसी यांच्यात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा 20 डिसेंबर ते 9 जानेवारी दरम्यान खेळविला जाईल. या स्पर्धेमध्ये आठ संघांचा समावेश असून पहिल्या टप्प्यात एकूण 28 सामने होणार आहेत. सदर माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने गुरूवारी दिली आहे. या स्पर्धेतील सामने कोलकात्याच्या एनसीओईच्या मैदानावर तसेच कल्याणी स्टेडियममध्ये खेळविले जातील. या स्पर्धेचा दुसरा टप्पा 20 एप्रिल ते 10 मे दरम्यान होणार आहे. वरिष्ठांच्या आणि 20 वर्षांखालील वयोगटातील महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी महिला फुटबॉलपटूंना सोय व्हावी यासाठी इंडियन महिलांची लीग फुटबॉल स्पर्धा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.