For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला हॉकीला अंतर्गत कलहाचं ग्रहण !

06:00 AM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
महिला हॉकीला अंतर्गत कलहाचं ग्रहण
Advertisement

भारतीय महिला संघाला सध्या ग्रासून टाकलंय ते अंतर्गत कलहानं...त्यात भर म्हणून मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना सोडचिठ्ठी द्यावी लागलेली असून त्यांना विविध आरोपांचा सामना करावा लागलाय...या पार्श्वभूमीवर ‘हॉकी इंडिया’वर प्रसंग आलाय तो नव्या प्रशिक्षकांचा शोध घेण्याचा...

Advertisement

कट-कारस्थानं, गटबाजी, पाठीत सुरा खुपसणं...भारतातील प्रत्येक क्षेत्रात या बाबींचं सर्रास दर्शन घडतंय....आपल्या देशातील महिलांचा वरिष्ठ हॉकी संघ देखील सध्या अडकलाय तो त्याच चक्रव्युहात...सुपरस्टार शाहरूख खानला अनेक पुरस्कार मिळवून देणारा ‘चक दे इंडिया’ आठवतोय ?...त्यातील कित्येक प्रसंगांची आठवण होतेय ती हॉकी संघाची सध्याची अंतर्गत दशा पाहून...वरिष्ठ महिला हॉकी संघ सापडलाय तो गटबाजी, अंतर्गत वैर आणि प्रादेशिक फूट यांच्यात. या बाबींना प्रारंभ झाला होता तो बऱ्याच वर्षांपूर्वी. परंतु यशाच्या झगमगणाऱ्या आवरणाखाली त्या लपून गेल्या. आता ज्वालामुखीप्रमाणं त्यांचा अचानक स्फोट झालाय...

त्याला सुरुवात झाली ती हॉकी क्षेत्रातील दिग्गज प्रशिक्षक आणि महिलांच्या संघाला मार्गदर्शन करणारे हरेंद्र सिंग यांच्या राजीनाम्यामुळं. दीड वर्षापासून प्रमुख प्रशिक्षकाच्या खुर्चीवर बसलेले हरेंद्र यांनी अकस्मात वैयक्तिक कारणांमुळं सोडचिठ्ठी दिली अन् पुन्हा प्रारंभ झाला तो जखम चिघळण्यास...त्यावेळी खेळाडूंचं प्रशिक्षण सुरू होतं ते बेंगळूर शहरात. सिंग यांनी गप्प बसणंच पसंत केलेलं असलं, तरी त्यांच्यावर अनेक महिला खेळाडूंनी आरोप केलाय तो आपल्या आवडत्या हॉकीपटूंना झुकतं माप देण्याचा, पक्षपाताचा तसंच मानसिक छळाचा...

Advertisement

आठ अत्यंत अनुभवी वरिष्ठ खेळाडूंनी ‘हॉकी इंडिया’ला दोन वेगवेगळी पत्रं लिहिलेली असून त्यात दावा केलाय की, शिबिरात कुणाचाही एकमेकांवर विश्वास राहिलेला नाहीये. त्या खेळाडूंनी कर्णधार सलीमा टेटे नि उपकर्णधार नवनीत कौर यांच्यावर आरोप केलाय तो स्थान अबाधित राहण्यासाठी हरेंद्र सिंग यांची बाजू घेतल्याचा...‘आमची वसतिगृहात झालेली चर्चा प्रशिक्षकांपर्यंत पोहोचविण्याचं काम तेथील महिला कर्मचाऱ्यांनी केलं. कर्णधार व उपकर्णधार यांनी संघातील एकजुटीला सुरुंग लावलाय’, पत्रातील शब्द...पत्रांनुसार, वरिष्ठ महिला संघ प्रादेशिक फुटीच्या आव्हानाचा सामना करतोय...

18 मुद्यांच्या सदर पत्रांत म्हटलंय, ‘संघाची कर्णधार झारखंडची असून तिच्यात नेतृत्व गुण अजिबात नाहीत. तिनं पदाचा गैरवापर केलाय आणि अन्य खेळाडूंना धमकावण्याचे प्रकार चाललेत. ‘मी कर्णधार असल्यानं माझ्यात क्षमता आहे ती काहीही करण्याची’ अशा प्रकारची भाषा वापरण्यात येतेय’...खुद्द कर्णधार अन् उपकर्णधार यांच्यातच समन्वय नसून जेव्हा वरिष्ठ खेळाडूंनी त्यांच्याकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी समर्थन केलं ते प्रशिक्षकांचं...नाव उघड करायला तयार नसलेल्या एका खेळाडूच्या मते, पुन्हा राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची तिची इच्छा नाहीये. कारण वातावरण कंटाळा येण्याइतकं बिघडून गेलंय...

विविध राष्ट्रीय संघांना मार्गदर्शन केलेल्या क्रीडाक्षेत्रातील विख्यात मानसिक तज्ञ डॉ. चैतन्या श्रीधर सांगतात की, संपूर्ण व्यवस्थाच बिघडून गेलीय..‘आमची ‘इको-सिस्टम’ खेळाडूंची क्षमता वा खेळाडूंमधील संबंध यांच्यावर आधारलेली नसून प्रत्येकाचं लक्ष केंद्रीत झालेलं असतं ते कामगिरीवर. खेरीज प्रादेशिकता हा एक मुख्य अडथळा बनून राहिलाय...भारतीय संघातील अनेक ग्रामीण खेळाडूंना फारसा अनुभव नसल्यामुळं सारा घोटाळा झालाय. त्यांची निवड झाल्यानंतर त्यांचे राज्यानुसार गट बनतात. या पार्श्वभूमीवर जन्म होतो तो पोषक नसलेल्या स्पर्धेला’, त्यांचं मत...

कुठल्याही सांघिक खेळात गरज असते ती प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक बाबींवरही लक्ष केंद्रीत करण्याची. अधिकाऱ्यांनी नजर ठेवायला हवीय ती संघ एकादिलासाने कसा वावरेल यावर...त्यासाठी आवश्यकता आहे ती एखाद्या अनुभवी प्रशिक्षकाची...महिला संघांचा विचार केल्यास खेळाडूंच्या भावना समजण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनुभवी पात्र महिला प्रशिक्षक नि व्यवस्थापक अत्यंत गरजेचे...सध्या ‘हॉकी इंडिया’नं या प्रश्नात अतिशय गंभीरपणे लक्ष घातलंय नि अध्यक्ष दिलीप तिर्की व सचिव भोलानाथ सिंग यांनी वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा करण्यास प्रारंभ केलाय...

कित्येक माजी प्रशिक्षकांच्या मते, महिला खेळाडूंना प्रशिक्षण देताना सामोरं जावं लागतंय ते अनेक आव्हानांना. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे संवेदनशीलता...भारताच्या माजी कर्णधार प्रीतम राणी सिवाच यांच्यानुसार, महिलांची हॉकी पोहोचलीय ती कोसळण्याच्या काठावर...भारतातील प्रत्येक खेळाडूला निवृत्तीच्या वेळी ताठ मानेनं चालण्याची संधी मिळतेच असं नाही. अंतर्गत गटबाजी व प्रशिक्षण शिबिरांतील बिघडलेलं वातावरण यांनी साऱ्या व्यवस्थेला यापूर्वीच ग्रासून टाकलंय. साऱ्या बाबींवर नजर केंद्रीत केल्यास वरिष्ठ खेळाडूंच्या महिला हॉकी संघाचा डोलारा डळमळीत झालाय हे सांगण्यासाठी फार मोठ्या क्रीडा विश्लेषकाची गरज नाहीये...

जर तातडीनं पावलं उचलली नाहीत, तर महिलांची हॉकी 30 वर्षं पाठीमागं ढकलली जाईल अशी भीती व्यक्त केली जातेय ती उगाच नव्हे. या पार्श्वभूमीवर 2028 मध्ये होऊ घातलेलं अमेरिकेतील लॉस एंजलिस ऑलिम्पिक अन् 2032 मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरणं दुरापास्तच..,भारतातील अनेक महिला खेळाडू निवृत्तीच्या जवळ पोहोचल्यानंतर आधार घेतात तो राजकारण्यांचा हे लपून राहिलेलं नाहीये. शिवाय त्यांना धन्यता वाटते ती कमी वयाच्या खेळाडूंना चुकीचं मार्गदर्शन करण्यात, भलतीच दिशा दाखविण्यात...प्रत्येक बाबीला दोन बाजू असल्यानं पद्धतशीररीत्या चौकशी करणं अत्यंत गरजेचं...

काही खेळाडूंच्या मते, वरिष्ठ खेळाडू तोंड उघडतात त्या निवृत्तीच्या वेळीच. त्यापूर्वी त्यांनी बांधलेली असते ती डोळ्यांवर पट्टी. ‘हॉकी इंडिया’नं मुख्य प्रशिक्षक, ‘अॅनेलिटिकल कोच’ आणि ‘सायंटिफिक अॅडव्हायजर’ यांच्यासाठी जाहिरात दिलीय. भारताला प्रमुख प्रशिक्षकपदासाठी पुन्हा एकदा वादग्रस्त ठरलेले प्रशिक्षक मार्जिन यांच्या दिशेनं वळावं लागेल अशीच चिन्हं दिसताहेत. यापूर्वी त्यांचा ‘हॉकी इंडिया’शी फार मोठा वाद झाला होता आणि त्यांनी भारतीय हॉकीची खरडपट्टी काढणारं पुस्तक सुद्धा लिहिलं होतं...मार्जिन भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दाखल झाले ते फेब्रुवारी, 2017 मध्ये.

त्यानंतर त्यांची रवानगी करण्यात आली ती पुरुष संघाच्या दिशेनं, तर महिला संघाचा ताबा देण्यात आला तो हरेंद्र सिंग यांच्याकडे. नऊ महिन्यांनंतर मार्जिन यांना पुन्हा एकदा महिलांच्या शिबिराची दिशा दाखविण्यात आली. तेच होते टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक. 2021 मध्ये त्यांनी ताबा सोडला !

घसरता आलेख...

  • गेले काही दिवस भारतीय हॉकीसाठी मैदानावर आणि मैदानाबाहेरही फारसे चांगले राहिलेले नाहीत...सर्वप्रथम महिला वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना त्यांच्या निराशाजनक कार्यकाळानंतर आणि मनमानीच्या आरोपांनंतर पदावरून दूर व्हावं लागलं...
  • काही महिन्यांच्या गदारोळानंतर जॅनेक शॉपमन यांनी राजीनामा दिल्यावर सिंग यांनी पद स्वीकारलं होतं. शॉपमन यांच्या काळात रुरकेला येथे झालेल्या आठ संघांच्या स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिल्यामुळं भारत 2024 च्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यानंतर भारतात झालेल्या एफआयएच प्रो-लीगमध्येही संघाची कामगिरी निराशाजनक राहिली...
  • याचा शेवट डच प्रशिक्षिकेच्या व्यवस्थेविऊद्ध भावनिक उद्रेकात झाला. त्यात त्यांना नियुक्त करणारी ‘हॉकी इंडियाही लक्ष्य बनल्याशिवाय राहिली नाही...त्यानंतर काही आठवड्यांनी ज्यांनी यापूर्वी महिला संघाला प्रशिक्षण दिलं होतं त्या सिंग यांच्याकडे सूत्रं सोपविण्यात आली. तथापि संघाला यश हुलकावणी देत राहिलं...
  • हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघानं एफआयएच प्रो-लीगमध्ये नऊ संघांत शेवटचा क्रमांक पटकावला आणि खेळलेल्या 16 पैकी 11 सामने गमावले...आशियाई खेळांना एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय आणि तेथील सुवर्णपदक विजेत्याला 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये थेट स्थान मिळेल. त्यामुळं महिला संघानं लवकरात लवकर आपली लय मिळवणं महत्त्वाचं...

महिला हॉकीतील प्रमुख यश...

  • ऑलिंपिक : चौथं स्थान (मॉस्को 1980, टोकियो 2020)...
  • आशियाई खेळ : सुवर्ण (1982), रौप्य (1998, 2018), कांस्य (1986, 2006, 2014)...
  • राष्ट्रकुल खेळ : सुवर्ण (2002), रौप्य (2010)...
  • आशिया चषक : विजेते (2004, 2017)...
  • आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : विजेते (2016, 2023, 2024)..,
  • एफआयएच प्रो लीग : कांस्य (2022-23)...

महत्वाचे क्षण...

  • भारतीय महिला हॉकी संघ 1980 मध्ये पहिल्यावहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला...
  • 1982 च्या आशियाई खेळांत त्यांनी कमाई केली ती पहिल्या पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाची...
  • 2002 मध्ये राष्ट्रकुल खेळांतील पहिलं सुवर्णपदक खात्यात जमा करण्यात आलं...
  • अमेरिकेविऊद्धच्या रोमांचक ‘प्लेऑफ’ विजयासह त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केलं...
  • 2024 च्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांनीं सर्व सामने जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजविलं आणि विश्वचषकासाठी पात्रता मिळविली...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.