महिला हॉकी : भारताची आयर्लंडवर मात
एफआयएच कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी : पूर्णिमा यादवचे दोन गोल
वृत्तसंस्था/ सांतियागो, चिली
पूर्णिमा यादवने नोंदवलेल्या दोन गोलांच्या आधारावर भारतीय महिला संघाने येथे झालेल्या एफआयएच कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक स्पर्धेतील शेवटच्या गटसाखळी सामन्यात आयर्लंडवर 4-0 असा एकतर्फी विजय मिळविला.
पूर्णिमाने 42 व 58 व्या मिनिटाला, कनिका सिवाचने 12 व्या व साक्षी राणाने 57 व्या मिनिटाला भारताचे गोल केले. पहिल्या सत्रात भारतीय महिलांनी जोरदार सुरुवात करताना आक्रमक खेळ केला आणि 12 व्या सेकंदालाच पेनल्टी कॉर्नर मिळविला. मात्र त्यावर त्यांना गोल करता आला नाही. भारताने आयर्लंडवर दबाव टाकणे पुढे चालूच ठेवले आणि 10 व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण यावेळीही त्यांना संधी साधता आली नाही. दोन मिनिटांनंतर साक्षीने सर्कलमध्ये कनिकाला परिपूर्ण पास पुरविला. कनिकाने आगेकूच करीत पुढे येणाऱ्या गोलरक्षकाला हुलकावणी देत मोकळ्या गोलपोस्टमध्ये चेंडू मारला.
17 व 23 व्या मिनिटाला भारताने आणखी दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. आयर्लंडची गोलरक्षक लुसी मॅकगोल्डरिकने दोन्ही गोल वाचवले. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण भारताला त्यावर गोल करता आला नाही. 42 व्या मिनिटाला साक्षी शुक्लाने आणि नंतर 57 व 58 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताने गोल नोंदवत विजय निश्चित केला.