महिला ब्रिगेडचा सलग दुसरा विजय
दुसऱ्या वनडेत आयर्लंडवर 116 धावांनी मात : जेमिमा रॉड्रिग्जची शतकी खेळी
वृत्तसंस्था / राजकोट
जेमिमा रॉड्रिग्जचे शानदार शतक, स्मृती मानधना, हरलीन देओल व प्रतिका रावल यांची शानदार अर्धशतके या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात आयर्लंडचा 116 धावांनी धुव्वा उडवला. भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 370 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आयर्लंडला मात्र 7 बाद 254 धावापर्यंत मजल मारता आली. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 91 चेंडूत 102 धावांची धमाकेदार खेळी साकारणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 15 रोजी खेळवण्यात येईल.
कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मानधना आणि प्रतिका यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी केली. मानधनाने 54 चेंडूत 10 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 73 धावा केल्या तर प्रतिकाने 61 चेंडूत आठ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 67 धावांची स्फोटक खेळी केली. स्मृती व प्रतिका लागोपाठ बाद झाल्यानंतर हरलीन देओलनेही अर्धशतक झळकावले. तिने 84 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 89 धावा केल्या. यानंतर स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सने शतकी खेळी साकारली. तिने 91 चेंडूंचा सामना करताना 112.08 च्या स्ट्राइक रेटने 102 धावा केल्या. यादरम्यान जेमिमा रॉड्रिग्सने 12 चौकार मारले. जेमिमाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. जेमिमाच्या या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकांत 5 बाद 370 धावा केल्या.
आयर्लंडचा दारुण पराभव
टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 371 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडला 254 धावापर्यंतच मजल मारता आली. आयर्लंडकडून कोलल्टर रीली हिने 10 चौकारासह 80 धावा केल्या. सारा फोर्ब्सने 38, लॉरा डेलानीने 37 आणि लीह पॉलने 27 धावा केल्या. तर या व्यतिरिक्त एकीलाही भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ 50 षटकांत 5 बाद 370 (स्मृती मानधना 73, प्रतिका रावल 67, हरलीन देओल 89, जेमिमा रॉड्रिग्स 102, प्रेंडरगास्ट व अर्लीन केली प्रत्येकी दोन बळी). आयर्लंड महिला संघ 50 षटकांत 7 बाद 254 (कोल्टर रीली 80, लॉरा डेलानी 37, दीप्ती शर्मा 3 बळी, प्रिया मिश्रा 2 बळी).
भारतीय महिलांची वनडे इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या
आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात भारताने 50 षटकांत 5 गडी गमावून 370 धावांचा डोंगर उभारला. महिला वनडेमधली ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2017 मध्ये भारताने बडोद्यात विंडीजविरुद्ध 358 धावा केल्या होत्या. महिलांच्या एकदिवसीय सामन्यातील ही एकूण 15 वी सर्वोच्च धावसंख्या आहे. महिलांच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंडने 2018 मध्ये डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध 491 धावा केल्या होत्या.