बारुआ, हुडा, किरण जॉर्ज अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / कडक (ओदीशा)
येथे सुरू असलेल्या ओदीशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत इशाराणी बारुआ, उन्नती हुडा आणि किरण जॉर्ज यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील शनिवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात इशाराणी बारुआने तानिया हेमंतचा 18-21, 21-7, 21-7 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा उपांत्य सामन्यात 54 मिनिटे चालला होता. आता इशाराणी बारुआचा अंतिम सामना टॉपसिडेड उन्नती हुडाबरोबर होणार आहे. महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात उन्नती हुडाने तस्नीम मीर तस्नीमचा 18-21, 21-16, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा उपांत्य फेरीचा सामना तासभर चालला होता. तस्नीमने या उपांत्य लढतीत पहिला गेम जिंकून उन्नतीवर दडपण आणले होते. पण पुढील दोन गेम्समध्ये तिने तस्नीमचे आव्हान संपुष्टात आणले.
पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात द्वितीय मानांकीत किरण जॉर्जने रोनकचा 21-19, 8-21, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. रोनक चौहानने या उपांत्य लढतीत किरण जॉर्जला कडवी झुंज दिली. त्याने किरण जॉर्जला विजयासाठी तिसऱ्या गेमपर्यंत झुंजविले. हा सामना 53 मिनिटे चालला होता. आता किरण जॉर्ज आणि इंडोनेशियाचा मोहम्मद युसुफ यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. या स्पर्धेत भारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या सात्विक रे•ाr आणि रेशिका यांना उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली तर महिला दुहेरीत अश्विनी भट्ट आणि शिखा गौतम यांचे आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाले. मिश्र दुहेरीच्या उपांत्य सामन्यात इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकीत डिजेन आणि वर्दना यांनी भारताच्या एस. कनापूरम आणि उत्तेयसूर्यान यांचा 21-16, 21-19 असा पराभव केला.