महिला ब्रिगेडचा विजयी प्रारंभ
पहिल्या वनडेत भारतीय महिलांची आयर्लंडवर मात : सामनावीर प्रतिका रावल, तेजल हसबनीस यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ राजकोट
वूमन्स टीम इंडियाने स्मृती मानधनाच्या नेतृत्वात आयर्लंडवर 6 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली. शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात आयर्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 239 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान 34.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केले. या विजयासह भारतीय महिलांनी 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना दि. 12 जानेवारी रोजी खेळवण्यात येईल.
सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात आयर्लंडने प्रथम टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सारा फोर्ब्सला (9) पाचव्या षटकात साधूने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर मधल्या फळीतील फलंदाजही स्वस्तात बाद झाल्याने आयर्लंडची 4 बाद 56 अशी स्थिती होती. पण, कर्णधार गॅबी लुईस व ली पॉल या दोघींनी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या जोडीने एकेरी दुहेरी धावावर भर देत धावफलक हलता ठेवला. ली पॉलने अर्धशतकी खेळी साकारताना 7 चौकारासह 59 धावांचे योगदान दिले. अर्धशतकानंतर ती रनआऊट झाल्याने आयर्लंडला मोठा धक्का बसला. दुसरीकडे, कर्णधार लुईसने मात्र संयमी खेळी साकारताना 129 चेंडूत 15 चौकारासह 92 धावा फटकावल्या. शतकाच्या उंबरठ्यावर असताना तिला दीप्ती शर्माने बाद केले. यानंतर तळाच्या महिला फलंदाजांनी थोडाफार प्रतिकार केल्याने आयर्लंडला 7 बाद 238 धावापर्यंत मजल मारता आली.
टीम इंडियाचा सहज विजय
आयर्लंडने विजयासाठी दिलेल्या 239 धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधना व प्रतिका रावल यांनी डावाची सुरुवात केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली. 10 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर स्मृती बाद झाली अन् ही जोडी फुटली. स्मृतीने 29 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 41 धावा फटकावल्या. स्मृती बाद झाल्यानंतर अनुभवी हरलीन देओल (20) व जेमिमा रॉड्रिग्ज (9) या दोघी झटपट बाद झाल्या. प्रतिका रावलने तेजल हसबनीससोबत शतकी भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. प्रतिकाने 96 चेंडूत 10 चौकार व 1 षटकारासह 89 धावांची दमदार खेळी केली. तिला तेजलने 9 चौकारासह नाबाद 53 धावांची खेळी साकारत तिला चांगली साथ दिली. प्रतिका रावल बाद झाल्यानंतर तेजल व रिचा घोष यांनी संघाला विजय मिळवून दिला. रिचा घोषने नाबाद 8 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड 50 षटकात 7 बाद 238 (गॅबी लुईस 92, ली पॉल 59, केली 28, प्रिया मिश्रा 2 बळी, दीप्ती शर्मा, तितास साधू, सातघरे प्रत्येकी एक बळी).
भारत 34.3 षटकांत 4 बाद 241 (स्मृती मानधना 41, प्रतिका रावल 89, हरलीन देओल 20, तेजल हसबनीस नाबाद 53, रिचा घोष नाबाद 8, एमी मॅकग्वायर तीन बळी).
स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, वनडेत चार हजार धावा
टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने आयर्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत 41 धावांची खेळी साकारली. या खेळीसह तिने वनडेत चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. हा विक्रम तिने अवघ्या 94 डावांमध्ये पूर्ण केला. याआधी हा पराक्रम टीम इंडियाच्या मिताली राजच्या नावावर होता. मितालीने ही कामगिरी 112 डावांत केली होती. या कामगिरी स्मृती वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात चार हजार धावा करणारी ती तिसऱ्या क्रमाकांची खेळाडू ठरली आहे. स्मृती मानधना भारताकडून वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर आहे. स्मृतीच्या नावे आता 4001 धावा आहेत. भारताकडून मिताली राजने सर्वाधिक 7805 धावा केल्या आहेत.
महिला वनडेत जलद चार हजार धावा करणाऱ्या फलंदाज
- बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया) - 86 डाव
- मेग लेनिंग (ऑस्ट्रेलिया) - 87 डाव
- स्मृती मानधना (भारत) - 95 डाव