कोल्हापूरात उभारतेय महिला रक्तदानाची चळवळ
महिलादिनानिमित्त ९ मार्चला फक्त महिला रक्तदान शिबिराचे आयोजन : तीन संघटनांचा महत्वाकांक्षी पुढाकार
कोल्हापूरः संग्राम काटकर
महाराष्ट्रात रक्तदान व प्लेटलेट दान करण्याची स्वयंस्फुर्तीने चळवळ राबवणारे धनंजय बाळकृष्ण पाडळकर (रा. धोत्री गल्ली तालीम) याची गतवर्षी १ मार्चला न्युमोनियाने अचानक एक्झीट झाली. निधनामुळे महिलांमध्ये रक्तदानाची चळवळ राबवण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. मात्र ही इच्छा पूर्ण करण्यासाठी धनंजय यांचे काल्हापुरातील मित्र अमोल सरनाईक, धनंजय नामजोशी व मुंबईतील आभास पाटील यांनी पुढाकार घेत महिला रक्तदान चळवळ हाती घेतली आहे. त्यांनी महिलादिन व पाडळकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ९ मार्चला फक्त महिलांचे दुसरे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये मिरजकर तिकटी येथील महालक्ष्मी बल्ड बँकेकडून रक्त संकलन केले जाणार आहे.
सामाजिक भान जपलेले धनंजय पाडळकर यांनी व्यवसाय सांभाळत रक्तदान व प्लेटलेट दान करण्याचा ध्यास जोपासला होता. त्यांनी ८५ वेळा रक्तदान तर ७९ वेळा प्लेटलेट देऊन ऊग्णांना जीवदान दिले. गावोगावी जाऊन ते रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे जनमाणसांना आवाहन करत होते. गतवर्षी त्यांनी महिलांनाही रक्तदानाच्या प्रवाहात आणण्यासाठी चळवळ सुरू केली. त्यांनी विविध व्हॉटस् अॅप ग्रुपच्या माध्यमातून महिलांचे रक्तदान करण्याकडे मन वळवायला सुरूवात केली होती. परंतू अचानक पाडळकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या महिला रक्तदान चळवळीलाच ब्रेक बसला. परंतू ही चळवळ पुढे नेण्यासाठी पाडळकर यांचे मित्र रक्तदान चळवळ राबवणारे ओंकार वेलफेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल सरनाईक व फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन आणि मैत्री दिंडी ग्रुपचे आभास पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी गतवर्षी आयोजित केलेल्या शिबिरात ५६ महिलांनी रक्तदान केले होते. हाच अनुभव घेऊन ९ मार्चला आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी येण्याचे महिलांना आवाहन करत आहेत. रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यची अनुभूतीही महिलांनी रक्तदान करूनच घ्यावी, असेही ते सांगतहेत. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी त्यांनी ‘जीवनदाता सामाजिक संस्था’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘प्रवास मैत्रीचा’ या ग्रुपचेही त्यांनी सहकार्य मिळवले आहे. तेव्हा आता महिलांनी पुढे येत शिबीरात रक्तदान करून पाडळकर यांनी हाती घेतलेली महिला रक्तदानाची चळवळ वृद्धींगत करावी, एवढीच सरनाईक व नामजोशी यांची अपेक्षा आहे.
महिलांनी रक्तदान केल्याने काय फायदे मिळतील, याबाबत लक्ष्मीपुरी अर्पण ब्लड बँकेचे क्वॉलिटी मॅनेजर बाबासाहेब आघाव यांच्या संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, रक्तदान केलेल्या शरिरातील लोहाची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत राहू शकते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. प्रत्येक चार महिन्यांनी रक्तदान केल्यास शरीरात नवीन व शुद्ध रक्त तयार होण्याचा मदत होते. शुद्ध रक्ताचा आरोग्यावर चांगला परिणाम होत राहतो. अंगावर पिणारे मुल असेल अथवा रक्तदानाच्या कालावधीत मासिक पाळीचा पिरेड असेल तर संबंधीत तरूणी-महिलांनी रक्तदान करणे टाळावे, असेही आघाव यांचे सांगणे आहे.
रक्तदान करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी खालील अटी...
- शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ टक्क्यांपेक्षा जास्त असावे.
- १८ ते ६० या वयोगटातील महिला रक्तदान शकतात.
- वजन ४५ किलो पेक्षा जास्त असावे.
- वर्षभरात कोणत्यात प्रकारची शरीरावर सर्जरी झालेली नसावी
- रक्तदाब ८०, १२० एमजी अथवा ९०,१३० एमजी असावा.
शिवाजी पेठेतील शिवाजी तरूण मंडळाच्या शिवाजी मंदिरात धनंजय पाडळकर पहिला स्मृतिदिन रक्तदान शिबीराचे आयोजन केले जात आहे. सकाळी १० दुपारी ४ चार अशी शिबीराची वेळ आहे. या शिबीरात ज्या महिला रक्तदान करतील, त्यांची मोट बांधून एक नवी संघटना स्थापन करण्यात येईल. या संघटनेच्या माध्यमातून समाजातील महिलांना रक्तदानाच्या प्रवाहात आणले जाणार आहे.
-अमोल सरनाईक (अध्यक्ष : ओंकार वेलफेअर फाऊंडेशन)