महिला मल्ल काजलचे दुसरे सुवर्णपदक
वृत्तसंस्था / सामुकोव्ह (बल्गेरिया)
येथे सुरू असलेल्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या 72 किलाs वजन गटात भारताच्या काजलने चीनच्या लियुचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. काजलचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक आहे.
महिलांच्या 72 किलो वजन गटातील अंमित सामन्यात काजलने चीनच्या युक्वि लियुचा 8-6 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक मिळविले. 2024 च्या कॅडेट विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेतील चॅम्पियन तसेच 20 वर्षांखालील वयोगटातील आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन काजलने या अंतिम लढतीत चीनच्या लियुला केवळ दोन गुणांच्या फरकाने पराभूत केले. या स्पर्धेमध्ये भारताच्या श्रुती आणि सारिका यांनी आपल्या वजन गटातून कांस्यपदके मिळविली.
कांस्यपदकासाठीच्या झालेल्या 50 किलो गटातील लढतीत श्रुतीने जर्मनीच्या जोसेफिनी रेनिचचा 6-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला. तर दुसऱ्या एका लढतीत सारिकाने पोलंडच्या व्हॅलेचुकचा 11-0 असा दणदणीत पराभव करत कांस्यपदक घेतले. या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक तपस्याने मिळवून दिले होते. तर 55 किलो गटात रिनाने, 68 किलो गटात सृष्टीने तसेच 76 किलो गटात प्रियाने रौप्य पदकांची कमाई केली.
बल्गेरियात झालेल्या या स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपविजेतेपद मिळविले. तर जपानने सात पदकांसह अजिंक्यपद पटकाविले. 60 किलो गटातील पुरुषांच्या ग्रिकोरोमन लढतीत भारताच्या सुरजने फ्रान्सच्या ग्रासोचा पराभव करत कांस्यपदक मिळविले. पुरुषांच्या विभागात भारताच्या प्रिन्सला 82 किलो गटात जपानच्या योशिदाकडून पराभव पत्करावा लागला. त्याच प्रमाणे अनुज 67 किलो गटात तर नमन 97 किलो गटात प्राथमिक फेरीतच पराभूत झाले. इजिप्तच्या इब्राहीमने भारताच्या विनीतचा तांत्रिक गुणावर पराभव केला.