सीआयएसएफमध्ये दिसणार ‘नारीशक्ती’
महिला बटालियनला केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिला सशक्तीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेत महिलांच्या भागीदारीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआयएसएफमध्ये पहिल्यांदाच ऑल-वुमेन बटालियनच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. हा निर्णय महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे मानले जात आहे.
सीआयएसएफ महिलांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सेवा बजावण्यासाठी एक लोकप्रिय पर्याय राहिला आहे. सीआयएसएफमध्ये सद्यकाळात 7 टक्क्यांपेक्षा अधिक महिला कार्यरत आहेत. महिला बटालियनमध्ये सामील होत देशभरातील युवतींना सीआयएसएफमध्ये सामील होण्याची आणि राष्ट्राची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
सीआयएसएफ मुख्यालयाने या नव्या महिला बटालियनसाठी भरती प्रक्रिया, प्रशिक्षण आणि मुख्यालयाचे स्थळ निश्चित करण्याची तयारी सुरू केली आहे. या बटालियनला खासकरून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून कमांडोच्या स्वरुपात व्हीआयपी सुरक्षा, विमानतळांची सुरक्षा आणि दिल्ली मेट्रो रेल्वे सुरक्षा यासारख्या विविध जबाबदाऱ्या त्यांना पार पाडता येतील.
सीआयएसएफमध्ये महिला बटालियनचा प्रस्ताव सुरक्षादलाच्या 53 व्या स्थापना दिनी केंद्रीय गृह मंत्र्यांच्या निर्देशानंतर समोर आला होता. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने लवकरच या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे सीआयएसएफच नव्हे तर सर्वच सुरक्षा दलांमध्ये महिलांच्या भागीदारीला चालना मिळणार आहे.
नव्या महिला बटालियनच्या स्थापनेमुळे सीआयएसएफच्या विविध जबाबदाऱ्यांमध्ये महिलांची भागीदारी अधिकच मजबूत होईल. ही बटालियन देशाच्या संवेदनशील संस्थांची सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण स्थानांच्या देखरेखीसाठी तयार केली जात आहे. महिलांना सुरक्षा दलांमध्ये नेतृत्व आणि कमांडिंग पोझिशनमध्ये येण्याची संधी मिळावी हा देखील या निर्णयामागील उद्देश आहे.