मल्लू हिंदू ऑफिसर्स ग्रूपवरून कारवाई
केरळमध्ये आयएएस के. गोपालकृष्णन अन् एन. प्रशांत निलंबित
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळ सरकारने शिस्तभंगाचे कारण देत आयएएस अधिकारी के. गोपालकृष्णन आणि एन. प्रशांत यांना निलंबित केले ओह. गोपालकृष्णन यांना सरकारी अधिकाऱ्यांसाठी एक धर्म आधारित व्हॉट्सअॅप ग्रूप निर्माण करण्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. तर एन. प्रशांत यांच्या विरोधात सोशल मीडियावर एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यावर टीका केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मुख्य सचिव आणि पोलिसांकडून प्राप्त चौकशी अहवालाच्या आधारावर या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.
तर संबंधित आयएएस अधिकाऱ्यांनी आपले व्हॉट्सअॅप क्रमांक हॅक करण्यात आले आणि त्याद्वारे धार्मिक ग्रूप स्थापन करण्यात आल्याचा दावा केला होता. राज्य सरकारने हिंदू आयएएस अधिकाऱ्यांसाठी ग्रूप निर्माण करण्यात आल्याप्रकरणी चौकशी केल्याचे राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी सांगितले आहे.
खासगी व्हॉट्सअॅप क्रमांक हॅक करत त्याचा वापर धार्मिक ग्रूप स्थापन करण्यासाठी केला गेल्याची तक्रार एका आयएएस अधिकाऱ्याने पोलिसांकडे नोंदविली होती. त्यांनी तिरुअनंतपुरम शहराच्या पोलीस आयुक्तांना तक्रार देत चौकशीची मागणी केली होती.
मल्लू हिंदू ऑफिसर्स नावाचा ग्रूप
या वादग्रस्त व्हॉट्सअॅप ग्रूपचे नाव मल्लू हिंदू ऑफिसर्स होते. यात विविध समुदायांच्या अधिकाऱ्यांना जोडण्यात आले आणि याला हिंदू समुदायाचा ग्रूप संबोधिण्यात आले. यासंबंधी माहिती कळताच अधिकाऱ्याने तत्काळ तक्रार नोंदवून स्वत:ला या ग्रुपपासून वेगळे केले आहे. तसेच त्याने स्वत:च्या तक्रारीत कुठल्याही अधिकाऱ्याचे नाव नमूद केले नव्हते.
मुख्य सचिवांचा अहवाल
ग्रूप निर्माण करण्यात योगदान नव्हते, आपला फोन हॅक करण्यात आल्याची चुकीची माहिती पोलिसांना दिल्याचा आरोप आयएएस अधिकाऱ्यावर आहे. तर प्रशांत यांच्या विरोधात ही कारवाई सोशल मीडिया पोस्टमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव ए. जयतिलक यांच्यावर टीका करण्याप्रकरणी झाली आहे. मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांनी या घटनांप्रकरणी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना एक अहवाल सोपविला होता आणि यात अखिल भारतीय सेवा वर्तन नियम, 1968 च्या संभाव्य उल्लंघनांबद्दल माहिती दिली होती. या अहवालाच्या आधारावरच मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना निलंबित करणे आणि त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिकाऱ्याचा दावा खोटा
गोपालकृष्णन यांचा फोन हॅक करण्यात आल्याचा दावा पोलिसांना खोटा असल्याचे आढळून आले आहे. त्यांचा खोटा दावा सेवा वर्तन नियमांचे उल्लंघन करणारा होता, तसेच खोटी तक्रार करणे आणि पुराव्यांची छेडछाड करण्याचा गुन्हाही त्यांच्या हातून घडला. त्यांनी स्वत:चा मोबाइल फॉरमॅट केल्यावरच तपासासाठी सोपविला होता असे पोलिसांचे सांगणे ओ.
निलंबन आदेशात काय?
गोपालकृष्णन यांच्याकडून निर्मित व्हॉट्सअॅप ग्रुपचा उद्देश राज्यात अखिल भारतीय सेवांच्या कॅडर्सदरम्यान विभाजनाला बळ देणे, फूट पाडणे आणि एकजुटतेला धक्का पोहोचविण्याचा असल्याचे सरकारचे प्रथमदृष्ट्या मानणे आहे. हा प्रकार राज्यात अखिल भारतीय सेवांच्या कॅडर्सदरम्यान सांप्रदायिकता आणि विभागणी निर्माण करणारा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे निलंबनाच्या आदेशात म्हटले गेले आहे. मुख्य सचिवांच्या अहवालात जयतिलक आणि प्रशांत यांच्यातील भांडणाचा तपशीलही देण्यात आला आहे.
कॅटमध्ये धाव घेणार
तर निलंबनाच आदेश प्राप्त झाल्याच्या काही तासातच वरिष्ठ आयएएस अधिकारी एन. प्रशांत यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट)चे दार ठोठावण्याची तयारी केली आहे. निलंबनाच आदेश फॅसिस्टवादी वृत्ती दर्शवित असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे.