नागपूरच्या महिला दूध उत्पादकांची 'गोकुळ'ला भेट ! गोकुळ शिरगांव येथील मुख्य प्रकल्प स्थळाची केली पाहणी
गोकुळच्या कार्यपद्धतीचे केले कौतुक
कोल्हापूर प्रतिनिधी
नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत नागपूर येथील 100 महिला दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी गोकुळला गोकुळ शिरगांव येथील मुख्य प्रकल्पास भेट दिली.यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिला शेतकऱ्यांचे स्वागत केले व दुग्ध व्यवसायाविषयी सखोल मार्गदर्शन गोकुळ निश्चितच करेल असे आश्वासन दिले.
यावेळी महिला शेतकऱ्यांनी तेथील व्यवस्थापन, संकलन, प्रक्रिया, उत्पादन, पॅकिंग याची पाहणी केली. पाहणी दरम्यान गोकुळमार्फत दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, दूध खरेदी दर याची सविस्तर माहिती देण्यात आली. अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिला दूध उत्पादक शेतकरी यांनी गोकुळ राबवित असलेल्या दूध उत्पादकांच्या हिताच्या अनेक योजनेचे व खास करून जनावरांच्या वरील आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे कौतुक केले. तसेच गोकुळने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली प्रगती दूध उत्पादकांच्या उत्कर्षाला चालना देणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक किसन चौगले, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत, जिल्हा परिषद नागपूर कृषी व पशुसंवर्धनचे सभापती प्रविण जोध, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे, पशुधन विकास अधिकारी डॉ. शकील अगवान, डॉ. राधा भोईटे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, महिला अधिकारी गीता उत्तुरकर, तृप्ती मदने आदी उपस्थित होते.