नव्या ‘मुली’च्या शोधात महिला
घर-पगार देण्यास तयार
चीनच्या हेनान प्रांतात राहणाऱ्या वृद्ध महिलेची कहाणी सध्या चर्चेत आहे. 76 वर्षीय महिलेचे वय वाढत असून आता तिला मदतीची गरज आहे. परंतु तिच्या दोन्ही मुली तिला मदत करत नाहीत, तर एक मुलगी तिच्यासोबत संभाषण देखील करत नाही, तर दुसरी मुलगी मानसिकदृष्ट्या कमजोर आहे.
देखभालीसाठी मुलीचा शोध
महिला स्वत: अस्थमाने त्रस्त असून फारवेळ चालू-फिरू शकत नाही. याचमुळे तिने एखादी मुलगी किंवा महिलेला स्वत:च्या ‘मुली’प्रमाणे स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलीने आपली देखभाल करावी. दैनंदिन कामांमध्ये मदत करावी आणि रुग्णालयात सोबत यावे असे या महिलेचे सांगणे आहे. कुणी तरी मला स्वीकारावे आणि याच्या बदल्यात मी खूप काही देण्यास तयार आहे. स्वत:च्या दोन फ्लॅट्सपैकी एक फ्लॅट, दर महिन्याला 3000 युआन (जवळपास 420 डॉलर्स) आणि स्वत:ची बचत देण्यास तयार आहे. माझी देखभाल करणाऱ्या मुलीला घर आणि आर्थिक सुरक्षा दोन्ही मिळावी, अशी या महिलेची इच्छा आहे.
मोठ्या मुलीने का राखले अंतर
नातीच्या पालनपोषणावरून झालेल्या भांडणामुळे मोठी मुलगी नाराज आहे. मोठी मुलगी बेरोजगार असून ती आईचा खर्च उचलू शकत नसल्याचे सांगते. आईच्या निर्णयांशी आपले देणेघेणे नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
कायदातज्ञांचे मत
आईची देखभाल करणे तिच्या मोठ्या मुलीची कायदेशीर जबाबदारी आहे. ती या जबाबदारीपासून पूर्णपणे अंग काढून घेऊ शकत नाही. जर एखादी अन्य महिला ‘नवी मुलगी’ होत तिची देखभाल करू इच्छित असेल, तर दोघींमध्ये लेखी करार करावा लागेल. या करारात महिला कोणकोणती जबाबदारी पार पडेल आणि त्या बदल्यात तिला काय मिळेल हे स्पष्ट नमूद असावे लागेल. यामुळे कायदेशीर वाद होणार नसल्याचे मत हेनानच्या वकील शी जुनकी यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सोशल मीडियावर या पोस्टवरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांना ही ऑफर अत्यंत चांगली वाटतेय. घर, पैसा आणि नोकरी एकत्र मिळत आहे. परंतु अनेक लोक संशयही व्यक्त करत आहेत. बहुधा ही महिला स्वत:च्या आणि स्वत:च्या कनिष्ठ मुलीची देखभाल करण्यासाठी कुणाला शोधत आहे, ती स्वत:च्या पोटी जन्मलेल्या मुलीला संपत्ती देत नाही, मग नव्या ‘मुली’सोबत कसे वागेल, असे काही लोकांचे म्हणणे आहे.