For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : बोळकवठे येथे जागतिक महिला किसान दिनानिमित्त महिला शेतकऱ्यांचा गौरव !

05:57 PM Oct 16, 2025 IST | NEETA POTDAR
solapur   बोळकवठे येथे जागतिक महिला किसान दिनानिमित्त महिला शेतकऱ्यांचा गौरव
Advertisement

                बोळकवठेच्या महिला शेतकऱ्यांनी राज्य व जिल्हास्तरावर मारली बाजी

Advertisement

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठे येथे जागतिक महिला किसान दिनानिमित्त हरभरा पीक स्पर्धा रब्बी हंगाम 2024 मध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक विजेत्या विद्यादेवी भिमाशंकर पुजारी व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या मायावती रमेश पुजारी यांचा कृषि विभागाच्यावतीने सन्मान करण्यात आला.

या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर प्रशिक्षण कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे, अनिता शेळके, मंडळ कृषी अधिकारी अश्विनी शिंत्रे, उप कृषी अधिकारी गौरवकुमार कामटे, सहाय्यक कृषी अधिकारी प्रभाकर जाधव उपस्थित होते.

Advertisement

प्रभाकर जाधव यांनी जागतिक महिला किसान दिनाची संकल्पना व महत्त्व बाबत माहिती दिली. गृहविज्ञान विषय विशेषज्ञ अनिता शेळके यांनी कृषि विज्ञान केंद्र यांच्यावतीने महिलांसाठी असणार्या विविध योजनांविषयी माहिती देऊन महिला सशक्तीकरण साठी कृषि विज्ञान केंद्राचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम बाबत माहिती दिली.

लालासाहेब तांबडे यांनी अतिवृष्टीनंतर पिकांची घ्यावयाची काळजी यामध्ये प्रामुख्याने कांदा, तूर ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक अवलंब करावयाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करून रब्बी हंगामातील हरभरा व ज्वारी पिकांचे लागवड तंत्रज्ञान विषयी माहिती दिली. मंडळ कृषि अधिकारी अश्विनी शिंत्रे व उप कृषि अधिकारी  गौरवकुमार कामटे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती व मार्गदर्शन केले. हरभरा पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2024 मध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक विजेत्या विद्यादेवी भिमाशंकर पुजारी व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या मायावती रमेश पुजारी यांचा कृषि विभागाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

तसेच कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कृषि विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत अष्टविनायक शेतकरी गटातील सदस्य शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी पिक प्रात्यक्षिक मध्ये परभणी शक्ती या वाणाचे बियाणे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व शेतकऱ्यांना प्रशिक्षण साहित्य, माहिती पुस्तिका वाटप करून प्रभाकर जाधव यांनी परभणी शक्ती वाणाचे वैशिष्ट्ये, लागवड तंत्रज्ञान व ज्वारी बिजप्रक्रिया विषयी मार्गदर्शन केले.

मनोगत व आभार व्यक्त करताना चेअरमन हिरण्णा पाटील यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ गावातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. प्रशिक्षण कार्यक्रमास अष्टविनायक शेतकरी गट व शिवयोगी महासिध्द शेतकरी गट अध्यक्ष, सचिव व गटातील शेतकरी, पोलिस पाटील धर्मराव कोळी, माजी सरपंच शांताबाई वडरे, ग्रामसंघ अध्यक्षा काळे, आशा वर्कर सुरेखा नाटीकर शेतकरी गट, ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते 

Advertisement
Tags :

.