महिला सक्षमीकरण हेच ध्येय
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : 19 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक
बेंगळूर : राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करणे, महिला व बालकल्याण खात्याला बळकटी देणे हेच माझे ध्येय आहे. आगामी काळात आमच्या खात्याला ‘नंबर वन’ बनविण्याचे माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. आयसीडीएस योजना अंगणवाडी स्थापनेचा सुवर्ण महोत्सव, ‘अक्का टास्क फोर्स’चे लोकार्पण, गृहलक्ष्मी सोसायटी उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी बेंगळूरच्या कंठीरवा क्रीडांगणावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी बेंगळूरमध्ये राज्यस्तरीय पूर्वतयारी बैठकीचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. या प्रसंगी त्यांनी 19 रोजी होणारा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन केले. आयसीडीएस कार्यक्रमांबाबत सल्ला आणि सहकार्य मिळविण्यासाठी बुधवारी पूर्वतयारी बैठक बोलावण्यात आली. 19 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला 40 हजारहून अधिकजण उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रम विनाव्यत्यय पार पाडण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मंत्री हेब्बाळकर यांनी केले.
गृहलक्ष्मी सोसायटीला लोकप्रियता मिळवून द्या!
राज्यात गृहलक्ष्मी योजना यशस्वीपणे जारी झाली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी गृहलक्ष्मी बहुद्देशीय सहकारी संस्था सुरू केली जात आहे. गृहलक्ष्मी योजनेच्या धर्तीवर गृहलक्ष्मी बँक योजनेला लोकप्रियता मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. गृहलक्ष्मी सोसायटीद्वारे कमी व्याजदराने 3 लाखापर्यंत कर्ज दिले जाईल,अशी माहिती त्यांनी दिली.
अक्का ‘टास्क फोर्स’ शब्द घरोघरी पोहोचवा
महिलांना अधिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी राज्यभरात ‘अक्का टास्क फोर्स’ सुरू करण्यात येत आहे. याकरिता खात्यातील अधिकारी पोलीस विभागाशी नियमितपणे संपर्कात आहेत. अक्का टास्क फोर्स हा शब्द घरोघरी पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांना केले. अक्का पथकात होम गार्ड्स, एनसीसी कॅडेट्स, महिला आणि बालकल्याण खात्याचे अधिकारी यांचा यात समावेश असेल. हे पथक घरोघरी भेट देऊन जागृतीही करणार आहे, असे त्यांनी सांगितले.