माढ्यात मराठा आरक्षणसाठी महिलांचे चक्री उपोषण; बार असोसिएशन व डाॅक्टर असोसिएशनचा पाठिंबा
माढा प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून माढ्यातील महिला आक्रमक झाल्या असून माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सकल मराठा समाजातील महिलांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. तर दारफळ सिना येथील ठिय्या आंदोलनात देखील महिला उतरल्या आहेत. येथे मोहन चव्हाण आमरण उपोषण करीत आहेत. चिंचोली व जामगाव येथे देखील ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. तालुक्यात आंदोलनाची धग वाढत आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील ल ६५ ते ७० ग्रामपंचायतीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या बाबतीतचे ठराव देखील मंजूर करण्यात आले आहेत.
दरम्यान, या उपोषणावेळी माढा बार असोसिएशन व डॉक्टर्स असोसिएशन यांनी आरक्षणच्या मागणीला पत्र देऊन पाठिंबा दिला.
सोलापूर- पुणे हायवेवर टायर जाळून आंदोलन
सोलापुरात मराठा आरक्षण प्रश्नावर आक्रमक झालेला सकल मराठा समाज मागे हटण्यास तयार नसून मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सोलापूर-पुणे हायवेवर मराठा समाज बांधवांनी टायर जाळून आक्रमक आंदोलन केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न उग्र झाला असून आंदोलनाचे आक्रमक स्वरूप दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.