कर्ज देण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक
रत्नागिरी :
तालुक्यातील गोळप कातळवाडी येथे कर्ज देण्याचे आमिष दाखवून महिलांना २ लाख ३० हजार ४९९ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ४ ते ११ नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत घडली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलांनी पूर्णगड पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ओमकार पालव (कुडाळ, सिंधुदुर्ग) असे संशयिताचे नाव आहे. २४ ऑक्टोबर रोजी एका फायनान्स कंपनीची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. ही बातमी वाचून तक्रारदार यांनी संबंधित कंपनीचा विभाग प्रमुख ओमकार पालव याला संपर्क केला. यावेळी पालव याने तुम्ही १० ते १२ महिलांचा गट तयार करा तुम्हाला कर्ज देण्याची व्यवस्था करतो अशी बतावणी केली. त्यानुसार महिलांनी गट तयार केला असता कर्ज प्रक्रिया, सभासद नोंदणी, भाग भांडवल फी, नोटरी स्टॅम्प आदीसाठी पैशांची मागणी केली.
आपल्याला कर्ज मिळणार असल्याने पालव याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलांनी रोख व गूगल पे द्वारे पालव याला एकूण २ लाख ३० हजार ४९९ रुपये दिले. पालव याने पैसे घेऊनही महिलांना कोणतेही कर्ज उपलब्ध करुन दिले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे या महिलांच्या लक्षात आले. त्यानूसार त्यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात पालव याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी पालव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३१८ (४) ३१६(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.